भाजपच्या मेगाभरतीत इंदापूरचे पाटीलही? 

राजकुमार थोरात
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे  आज इंदापूर तालुक्‍याचे राजकारण ढवळून निघाले. पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

वालचंदनगर (पुणे) : कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे आज इंदापूर तालुक्‍याचे राजकारण ढवळून निघाले. पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. 

हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा सुरू झाली. या चर्चेला आज सकाळपासून वेग आला. पाटील यांचा आज वाढदिवस होता. ते तालुक्‍यात नसतानाही कार्यकर्त्यांनी वाढदिवस जोशामध्ये साजरा केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान आमदारांच्या जागा ज्या- त्या पक्षाकडे राहतील, असे सूत्र सांगून एखादी जागा अपवाद असल्याचे सांगितले होते. मात्र, इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यापासून गावभेट दौऱ्यांचे आयोजन करून "जनता सांगेल त्या पक्षातून निवडणूक लढविणार' असे सांगितले. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तालुक्‍यातून 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्‍य दिले असून, विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन केले. मात्र, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, गावभेटीदरम्यान पाटील यांनी काहीही झाली तरी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे ठासून सांगितले.
गावोगावचे कार्यकर्तेही त्यांना "भाजपमध्ये प्रवेश करा. हर्षवर्धन पाटील हाच आमचा पक्ष आहे. तुम्ही ज्या पक्षात झेंडा हातात घेणार; त्या पक्षाचा आम्ही प्रचार करणार,' अशी गळ घालत होते. दरम्यान, पाटील यांनी 12 ऑगस्ट रोजी मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांना इंदापूरची जागा आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादीला जाणार असल्याचा अंदाज आला. त्यामुळे त्यांनी अचानक मेळावा पुढे ढकलला. त्यातून त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित असल्याची चर्चा सुरू झाली. 

सध्या इंदापूर तालुक्‍यातील प्रशासनावर वचक नाही. किरकोळ कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. हर्षवर्धन पाटील भाजप पक्षातून आमदार झाल्यास सर्वसामान्य नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागण्यास मदत होईल. त्यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार आहे. 
- राजकुमार भोसले, 
सरपंच, जंक्‍शन 

इंदापूर तालुक्‍यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांची हजारो एकर पिके जळाली. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यास तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कालव्यातून हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. 
- भारती मोहन दुधाळ, 
जिल्हा परिषद सदस्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patil will enter BJP