हवेली, भोर, वेल्हे, पुरंदर, मुळशी ‘टोल फ्री’

हवेली, भोर, वेल्हे, पुरंदर, मुळशी ‘टोल फ्री’

खेड शिवापूर - येत्या आठ दिवसांत खेड शिवापूर टोल नाका पीएमआरडीए हद्दीबाहेर हलविण्याचा निर्णय केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली (पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड), भोर, वेल्हा, पुरंदर, मुळशी या तालुक्‍यांतील वाहनांना टोल नाक्‍यावरून टोल फ्री सोडण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे-सातारा टोल रोड कंपनी यांनी लिखित आश्‍वासन दिले. त्यानंतर खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने रविवारी आंदोलन मागे घेतले.

खेड शिवापूर टोल नाका पीएमआरडीए हद्दीबाहेर हलविण्यात यावा, या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीतर्फे रविवारी खेड शिवापूर टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. रविवारी सकाळी दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, आमदार भीमराव तापकीर, माऊली दारवटकर, दिलीप बाठे, डॉ. संजय जगताप, विलास बोरगे, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, भोरचे तहसीलदार अजितसिंह पाटील, हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी तसेच समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोल नाका हटावच्या घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केले. या वेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृती समितीचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे-सातारा टोल रोड कंपनीचे अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत चर्चा केल्यानंतर समितीच्या वतीने खासदार सुळे यांनी समितीची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सुमारे तीन तासांनी हे आंदोलन मागे

घेण्यात आले. दारवटकर म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसांत टोल नाका हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, टोल नाका हटेपर्यंत कृती समिती मागे हटणार नाही. जोपर्यंत टोल नाका हटत नाही, तोपर्यंत भोर, वेल्हा, हवेली, मुळशी, पुरंदर, पुणे-शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांना टोल नाक्‍यावरून टोल फ्री सोडण्यात येईल.’’

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, ‘‘कृती समितीच्या मागण्या तसेच आज झालेला निर्णय याबाबत येत्या आठ दिवसांत केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठक होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार पुढे योग्य तो निर्णय घेण्यात येईल.’’

येत्या आठ दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कृती समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक होईल. या बैठकीत टोल नाका हटविण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. 
- सुप्रिया सुळे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com