ऊसाच्या शेतात झोपलेल्या आरोपींवर पोलिसांची झडप; नांदेड फाटा खून प्रकरणी पाचही आरोपींना कर्नाटकात अटक

निलेश बोरुडे
Sunday, 15 November 2020

12 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नांदेड फाट्याजवळील कीर्ती हॉटेलच्या समोर भररस्त्यावर अजय शिंदे याची कोयता, लोखंडी पाईप, विटा इत्यादींचा वापर करून अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती.

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे 12 नोव्हेंबर रोजी अजय शिवाजी शिंदे  या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार झालेल्या पाचही आरोपींना हवेली पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेतले आहे. कोणतीही तांत्रिक माहिती हाती नसताना मोठ्या शिताफीने कारवाई करत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

राहुल संपकाळ, रोहित संपकाळ, दुर्वेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ सुध्या आणि पृथ्वी उर्फ चिराग (सर्व राहणार नांदेड ता.हवेली, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी हत्येची कबुली दिली आहे.

Breaking:...तोपर्यंत सारसबाग खुली होणार नाही; महापालिकेने दिले स्पष्टीकरण

12 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नांदेड फाट्याजवळील कीर्ती हॉटेलच्या समोर भररस्त्यावर अजय शिंदे याची कोयता, लोखंडी पाईप, विटा इत्यादींचा वापर करून अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर सर्व आरोपी आपले मोबाईल फोन बंद करून फरार झाले होते. मोबाईल फोन बंद असल्यामुळे आरोपींचे लोकेशन मिळवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

आरोपींच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, संतोष भापकर, राजेंद्र मुंढे आणि तीन होमगार्ड असे एक पथक घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी साताराकडे रवाना झाले होते. आरोपीच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करून आरोपी कोठे जाऊ शकतात, याची माहिती पोलीस नाईक रामदास बाबर शोधासाठी गेलेल्या पथकाला कळवत होते.

'उशीरा का होईना शिक्षणमंत्र्यांना शहाणपण आलं'; 'आप'चा टोला

सातारा येथून आरोपी कर्नाटकातील विजापूर येथे गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे शोध पथक रात्री बाराच्या सुमारास आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी गेले. उसाच्या शेतातील खोलीत हे सर्व आरोपी झोपलेल्या अवस्थेत असतानाच पोलिसांनी सर्वांना जेरबंद केले. हवेली पोलिसांच्या शोध पथकाने अत्यंत गोपनीयरित्या ही कारवाई केली.

गुन्हा घडल्यापासूनच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील या तपासावर लक्ष ठेवून होत्या. त्यामुळे हवेली पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस प्रवास करत मोठ्या शिताफीने सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haveli police arrested five accused in Nanded Phata murder case from Karnataka