Breaking:...तोपर्यंत सारसबाग खुली होणार नाही; महापालिकेने दिले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

शहरातील ज्या बागा-उद्यानांत नागरिकांची गर्दी होईल आणि नियम पाळले जाणार नाहीत, त्या साऱ्याच उद्यानांना पुन्हा टाळे लागणार असल्याचेही महापालिकेच्या उद्यान खात्याकडून सांगण्यात आले.

पुणे : ज्येष्ठ आणि मुलांना बंदी असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत नागरिक बागा-उद्यानांत गर्दी करू लागल्याने आता पुन्हा उद्याने बंद करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यांत सारसबाग बंद करण्यात आली असून, राज्य सरकारची परवानगी मिळेपर्यंत सारसबाग खुली होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियासोबत साजरी केली दिवाळी; व्हाईट हाऊस उजळले दिव्यांनी!​

शहरातील ज्या बागा-उद्यानांत नागरिकांची गर्दी होईल आणि नियम पाळले जाणार नाहीत, त्या साऱ्याच उद्यानांना पुन्हा टाळे लागणार असल्याचेही महापालिकेच्या उद्यान खात्याकडून सांगण्यात आले. कोरोनात गेली साडेसात महिने बंद असलेली उद्याने गेल्या पंधरा दिवसांपासून उघडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांत ८१ उद्याने खुली झाली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणजे, ६५ पेक्षा अधिक वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना प्रवेश नसेल, असे जाहीर करण्यात आले. तर ज्यांना प्रवेश असेल, त्यांच्यासाठी नियमावलीही तयार केली. मात्र, बागा-उद्यानांत
सर्रास ज्येष्ठ नागरिकच येत असल्याचे दिसून येत आहे. तर हिंडता-फिरताना मास्कही लावत नसल्याचे महापालिकेच्याच निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी लहान मुलेही येत आहेत. ही परिस्थिती न बदल्यास उद्याने बंद करण्याचा इशारा महापालिकेच्या उद्यान खात्याचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिला होता. त्यानुसार सारसबाग बंद झाली.

चोरट्याचा दिवाळी धमाका; लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला​

दिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून सारसबागेत रोज सकाळी-सायंकाळी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातही बहुतेकजण कुटुंबियांसह येत आहेत. त्यातील ज्येष्ठ आणि लहान मुलांना अडविल्यास लोक वाद घालत असल्याच्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. तर पुढच्या काही दिवसांत सारसबागेत छोटे-मोठे कार्यक्रमही होण्याची शक्यता होती. त्यामुळे ती बंद करण्यात आली आहे.

उद्याने-बागांत येण्यासाठी नागरिकांना नियमावली ठरवून दिली आहे. विशेषत: मास्क आणि सोशल डिस्टन्स परंतु, त्याकडेच गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो. खबरदारी म्हणून काही बागा-उद्याने बंद करीत आहोत. 
- अशोक घोरपडे, प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC clarified that Sarasbagh will not be open till permission of state government is obtained