पुण्यात हॉटेल मालकाचे खंडणीसाठी अपहरण; पोलिसांनी कशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नामांकीत हॉटेल चालकाचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना हवेली पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यांपूर्वी अपहरणाची घटना घडली होती. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

पुणे : नामांकीत हॉटेल चालकाचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना हवेली पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यांपूर्वी अपहरणाची घटना घडली होती. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना दोघांना बेड्या ठोकल्या. तर अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

सागर सुनील शिरवाळे (वय 31, रा. नांदेड फाटा), महेश उर्फ बबलू तानाजी नलावडे (वय 25, रा. निगडे) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. तर गजानन विलास मोरे (रा.नऱ्हे), आदित्य रामभाऊ साळुंखे (रा.कोथरुड) हे दोघे अद्याप फरारी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील एका नामांकीत हॉटेल व्यावसायिक 30 ऑगस्टला रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून दुचाकीवरुन घरी जाताना खडकवासला येथील डीआयएटीच्या प्रवेशद्वाराजवळ एका कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर त्यातून उतरलेल्या आरोपींनी फिर्यादीस जबरस्तीने गाडीमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. आरोपी रात्रभर हॉटेल व्यावसायिकास गाडीतच मारहाण करीत फिरवित होते. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांन हवेली पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबांस फोन करुन 80 लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीपोटी सहा लाख रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन परिसरात पैसे घेऊन गेले, त्यावेळी आरोपींनी पैसे घेऊन जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकास तेथे सोडून पळ काढला.या घटनेनंतर हॉटेल व्यावसायिक रुग्णालयात उपचार घेत होते. या घटनेनंतर पोलिस अधिक्षक संदिप पाटील, उपअधिक्षक सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरूवात केली.पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, रामेश्वर धोंडगे, संजय शेंडगे, रवींद्र नागटिळक, रामदास बाबर, अनिकेत सोनवणे, सूर्यकांत राऊत, मंगेश भगत, गणेश धनवे, राजू वानोळे, राजेंद्र चंदनशिव, रवींद्र शिनगारे, अमोल शेडगे, दिलीप जाधवर, श्रीकांत माळी यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. 

असा घेतला आरोपींचा शोध!  
खंडणीसाठी संपर्क साधलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती पोलिसांनी मागविली. त्यानुसार, संबंधीत आरोपी 14 ऑक्‍टोबरला नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साध्या वेशातील पोलिसांनी नलावडे व शिरवाळे यांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांच्याकडून 20 हजारांची रोकड, बिहार येथून चोरलेली कार पोलिसांनी जप्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haveli police have arrested two accused for ransom

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: