Haveli News : पोलीस ठाण्यातीलच CCTV कॅमेरे बंद; अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस ठाण्यातीलच CCTV कॅमेरे बंद; अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

पोलीस ठाण्यातीलच CCTV कॅमेरे बंद; अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी: पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात येणाऱ्या हवेली पोलीस ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. नवीन कॅमेरे बसविण्यात येत असल्याने जुन्या कॅमेऱ्यांच्या वायर तोडण्यात आल्या असे हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार सांगत आहेत तर जुन्या कॅमेऱ्यांच्या वायर तोडण्याचा आमचा संबंध नाही असे बिनतारी विभागाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब सुंबे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

हवेली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सध्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, यांसह एकूण सतरा गावांचा समावेश आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमी गावं असली तरी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी पोलीस ठाण्यात ये-जा करणारांची संख्या मोठी असते. पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेले आठ ते नऊ कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याने एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची सत्यता कशी तपासणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच झाली आहे 'लाचलूचपत'ची कारवाई

हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व काही अधिकारी राजरोसपणे नागरिकांकडे पैशांची मागणी करतात असा अनेकांचा आरोप आहे. दोन महिन्यांपूर्वी एका जुन्या अपघाताच्या प्रकरणात आरोपीकडून दहा हजारांची लाच घेताना हवेली पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस फौजदार व एक पोलीस नाईक यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी हवेली पोलीस ठाण्यात चालणारा गैरप्रकार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.

'समुपदेशन' खोल्यांमध्ये सीसीटीव्हीचा अभाव

गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या किंवा आरोपींशी संबंध असलेल्या संशयितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचे 'पोलीसी पद्धतीने समुपदेशन' केले जाते. त्यासाठी विशिष्ट खोल्यांमध्ये आरोपींना किंवा संशयितांना नेण्यात येते. या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत किंवा बंद आहेत. त्यामुळे बिनधास्त हात साफ केला जातो असे नाव न छापण्याच्या अटीवर एका आरोपीने सांगितले. अशी मारहाण रोखण्यासाठीही सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत.

हेही वाचा: अंबाला कारागृहाच्या मातीपासून बनणार नथुराम गोडसेचा पुतळा

"नवीन कॅमेरे बसविण्यात येत आहेत त्यामुळे संबंधित काम करणारांनी जुन्या कॅमेऱ्यांच्या वायर तोडल्या आहेत. जुने कॅमेरे तरी सुरू करावेत यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. जाणीवपूर्वक कॅमेरे बंद ठेवण्याचे कारण नाही."

- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

"आमच्याकडून नवीन कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. जुने कॅमेरे आम्ही बंद केले नाहीत. त्यांची दुरुस्ती करणे ही संबंधित पोलीस निरीक्षकांची जबाबदारी आहे. दोन महिन्यांत नवीन कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल."

- आबासाहेब सुंबे, पोलीस निरीक्षक, बिनतारी विभाग, पुणे ग्रामीण पोलीस.

loading image
go to top