पैशांसाठी त्यांनी गाठली स्मशानभूमी...

पीतांबर लोहार
मंगळवार, 10 जुलै 2018

पिंपरी - सकाळी अकराची वेळ... भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर झोपडपट्टीतून नेहरूनगर स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली... फुलांच्या पाकळ्या, चुरमुरे अन्‌ एक रुपया- पन्नास पैशांच्या नाण्यांची उधळण मयतावरून केली जात होती... त्याच रस्त्याने शाळेत जाणारी चिमुकले विद्यार्थी पैसे वेचत होती... त्यांना शाळेला उशीर होत असल्याचे भान होते ना वाहनांखाली सापडण्याची भीती... लक्ष्य एकच अधिकाधिक पैसे गोळा करणे... एक-दीड किलोमीटर चालून त्यांच्याशी संवाद साधला... ‘मयताची कसली भीती!, पैसे मिळतात ना?’ या त्यांच्या उत्तराने अंगावर शहारे आले. 

महापालिकेच्या नेहरूनगर येथील शाळेत तिसरी, सहावी आणि सातवीत शिकणारी ही मुले. अंत्ययात्रेच्या मागे-मागे चालत होती. शाळेची वाट सोडून त्यांनी थेट स्मशानभूमी गाठली. एकाला त्याचे वडील कळतच नाहीत. तो काही महिन्यांचा असतानाच त्यांचे निधन झालेले. ‘ते दारू प्यायचे, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे लोक सांगतात’, असे तो विद्यार्थी म्हणाला. त्याची आई पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करते. त्याला दोन भाऊ आहेत. अन्य दोघे भाऊ-भाऊ होते. एक तिसरीला, दुसरा सहावीला. वडील बिगारीकाम करतात. आई कंपनीत रोजंदारीने कामाला जाते. त्यांच्याही घरात आणखी दोन भावंडे. नेहरूनगर येथील भोसले चौकात तिघांनाही खायला देऊन बोलते केले. वडापाव खातखातच त्यांनी गोळा केलेले पैसे मोजायला सुरवात केली.

त्यात बहुतांश पन्नास पैशांची नाणी होती. त्याबद्दल सहावीतला राम (काल्पनिक नाव) म्हणाला, ‘‘एक रुपया, दोन रुपये खर्च करणार. पन्नास पैसे खेळात वापरणार.’’ काय खेळणार? असे विचारताच त्याने उत्तर दिले ‘छापा-काटा’ आणि पैसे पॅंटच्या खिशात कोंबून छोट्या भावाला सोबत घेऊन तो स्मशानभूमीकडे निघाला. पैसे गोळा करीत. शाळेचा रस्ता सोडून. सातवीतील विद्यार्थी घुटमळला. ‘मी नाही पैसे गोळा केले’ असे न विचारताच त्याने सांगितले; पण त्याच्याही खिशात चिल्लर पैसे होते. त्याला दुचाकीवर घेऊन गणेश चौकात सोडले. तो अनवाणी होता. चप्पल तुटल्यामुळे आणली नसल्याचे त्याने सांगितले. नवीन चप्पल घेण्यासही त्याने नकार दिला. आईच्या कष्टाची जाण आणि वडील नसल्याचे दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवले. खूप आग्रह केल्यानंतर एक पेन घेतला आणि तो शाळेकडे निघाला... अनवाणीच. स्मशानाकडे गेलेले ते दोघे मात्र शाळेच्या वाटेवर येताना दिसले नाहीत. शाळेची वेळ होऊनही.

Web Title: He reached the crematorium for money