तो गोव्याकडे निघाला होता हिरो बनण्यासाठी..

प्रफुल्ल भंडारी 
शुक्रवार, 25 मे 2018

दौंड (पुणे) : चित्रपट सृष्टीत करिअर करण्यासाठी कुटुंबीयांना न सांगता हरियाणा येथून गोव्याकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलास दौंड लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही सखोल माहिती नाही परंतु चित्रपटांमध्ये दाखवितात त्याप्रमाणेच स्वतःचे गाव सोडून अन्यत्र नशीब आजमवण्यासाठी निघालेल्या या मुलाच्या या आकर्षणापायी पालक हवालदिल झाले होते. 

दौंड (पुणे) : चित्रपट सृष्टीत करिअर करण्यासाठी कुटुंबीयांना न सांगता हरियाणा येथून गोव्याकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलास दौंड लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही सखोल माहिती नाही परंतु चित्रपटांमध्ये दाखवितात त्याप्रमाणेच स्वतःचे गाव सोडून अन्यत्र नशीब आजमवण्यासाठी निघालेल्या या मुलाच्या या आकर्षणापायी पालक हवालदिल झाले होते. 

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांनी आज (ता. 24) या बाबत माहिती दिली. खासगी वाहतूक निरीक्षक असलेले रामवीर कागडा यांचा थोरला मुलगा रतन रामवीर कागडा (वय 15, रा. फतेहाबाद, हरियाणा) हा 20 मे रोजी कुटुंबीयांना न सांगता घरातून निघून आला होता. घरातून निघताना तीस हजार रूपये सोबत घेऊन रामवीर हा फतेहाबाद येथून नवी दिल्ली येथे पोचला. नवी दिल्ली येथे दोन दिवस अनेक चित्रपट पाहून, अंगावर टॅटू काढून तो गोव्यासाठी रेल्वेने निघाला होता. चित्रपट सृष्टीचे विलक्षण आकर्षण, गोव्याची निसर्ग संपदा एेकून त्याने तेथे छोटे मोठे काम करून उपजीविका करून या सृष्टीत करिअर करण्याचे ठरविले होते. घरात कोणताही कलह झालेला नसताना फक्त हिरो बनण्यासाठी तो गोव्याकडे निघाला होता. 

दरम्यान तो बुधवारी (ता. 23) गोवा एक्सप्रेसने दौंड रेल्वे स्थानकावर उतरला. रात्री गस्तीवर असणार्या पथकातील पोलिस नाईक श्रध्दा पठारे, आनंद वाघमारे, संतोष कांबळे, दत्तात्रेय खोत व हर्षल तोरणे यांना तो बावरल्याचे लक्षात आले व पोलिसांना पाहून तो लपत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्याला विश्वासात घेऊन त्याला आहार व शीतपेये दिल्यानंतर त्याने घरातून निघून येण्याचे कारण सांगितले. त्याच्याकडे मोजके पैसे उरले होते. स्वतःकडे मोबाईल नव्हता परंतु त्याला वडिलांचा मोबाईल क्रमांक पाठ असल्याने तो सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी वडिलांशी व फतेहाबाद सीटी पोलिसांशी संपर्क साधला.

काल त्याचे वडील व फतेहाबाद सीटी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर रतन कागडा यास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. रतनच्या या विक्षिप्त वागणुकीचा त्याच्या वडिलांना प्रचंड राग होता परंतु लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपला मुलगा सापडल्याचा आनंद ते लपवू शकले नाहीत.

रतन कागडा हा इयत्ता नववी उत्तीर्ण असून त्यास एक धाकटा भाऊ असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. 

Web Title: he went to goa to become actor he caught police at daund