पुणे जिल्ह्यातील पावसाची अखेर जोरदार बॅटिंग 

ravade.
ravade.

पुणे : मुळशी व भोर तालुक्यात अखेर काल रात्रीपासून पावसाने दमदार सुरवात केली आहे. भात पिकासाठी ओळख असलेले हे दोन्ही तालुके पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत आले होते. मात्र, अखेर पावसाने सुरवात केल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. आता पाऊस धरणे भरणार का, याची प्रतीक्षा आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य
 
भोर : भोर तालुक्‍यात सोमवारी (ता. 3) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गतवर्षीच्या 4 ऑगस्टच्या पुराच्या आठवणी जाग्या झाल्या. गेल्यावर्षी 4 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील सर्व नद्यांना महापूर आला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या वर्षीही मंगळवारी (ता. 4) दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुराच्या आठवणींना उजाळा मिळाला. गेल्यावर्षी 4 ऑगस्टला तालुक्‍यातील भाटघर व नीरा देवघर ही धरणे पूर्ण भरली होती. त्यामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. भाटघर धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सांगवी- हरतळी गावादरम्यानच्या आणि माळवाडी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने भोर- पुणे वाहतूक बंद पडली होती. धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या विद्युत पारेषणच्या पॉवर हाऊसमध्ये पुराचे पाणी गेल्याने तालुक्‍याची वीज खंडीत झाली होती. या वर्षी तालुक्‍यात तुरळक सरी वगळता मान्सूनचा पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांनी थोड्या पाण्यामध्ये भातलावणी केली, परंतु पावसाअभावी रोपे करपू लागली होती. सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरात सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. उशिरा का होईना पाऊस पडून शेतातील पिकांना जीवदान मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जोरदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. गेले पंधरा ते वीस दिवसांपासून पूर्णपणे दडी मारलेल्या पावसाने अनेक ठिकाणी भात लावणी रखडली होती. ज्या ठिकाणी भात लावणी झाली होती त्या ठिकाणी पाण्यामुळे भातपीक धोक्‍यात आले होते. सर्व शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. गेले आठवडाभर तर कडक ऊन पडत होते. त्यामुळे भातपीक हातचे जाते की काय, अशी शेतकऱ्यांची भीती होती. मात्र भोर व वेल्हे तालुक्‍यात सर्वदूर चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झाला असून पाणी वाहू लागले आहे. 

कोळवण : मुळशी तालुक्‍यात तीन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी भातलागवड रखडली होती तर आधीच्या पावसावर लावलेली भाते पावसाअभावी पिवळी पडली होती. या पावसामुळे भातपिकाला दिलासा मिळाला आहे. मुळशी तालुका हा कोकणाला लागून असल्यामुळे दरवर्षी पावसाचा थोडा जोर आहे. त्यामुळे येथील शेतकरी भात हेच खरीप हंगामात मुख्य पीक घेतात. सुरुवातीला पाऊस कमी असल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भातलागवड उरकून घेतली. परंतु, याच दरम्यान उन्हाचेही प्रमाण जास्त असल्याने पिके करपू लागली होती. ज्या शेतींना सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांची लागवड रखडली होती. अशा शेतकऱ्यांना पावसामुळे पुरेसे पाणी झाल्याने भातलागवड करता येणार आहे. परंतु, भात पेरणी करून खूप दिवस झाल्याने भाताची मुळे खोल जातात परिणामी रोपे काढणे जड होते. ऐन जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने आषाढधारा या वर्षी बरसल्याच नाहीत. मागील वर्षी भारतात चेरापुंजीला मागे टाकीत सर्वाधिक पाऊस ताम्हिणीत कोसळला. परंतु, या वर्षी चक्रीवादळादिवशी व त्यानंतर दोन- तीन वेळी वळवाच्या स्वरूपात पाऊस झाला. यानंतर कडक उन्हाने त्रस्त केले. याचा फटका मोठ्या प्रमाणात पिकांना बसला. पावसाचे महिने निघून गेले तरी सरासरी तरी पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. 

भुकूम ः मुळशी तालुक्‍यात सोमवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी आले असून, वाडी व डोंगरकडेच्या क्षेत्रातील भात लावणीसाठी पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यात पावसाने मोठी उघडीप दिली होती. डोंगरकडेच्या शिवारातील भातरोपे वाळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत होते. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे शिवारात पाणी झाले असून, शेतकरी रखडलेली भात लावणी सुरू करू शकतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com