पिंपरी शहर परिसरात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

शहर परिसरात हुलकावणी देत असलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २७) दुपारी दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मात्र, बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने ते सुखावले.

पिंपरी - शहर परिसरात हुलकावणी देत असलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २७) दुपारी दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मात्र, बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने ते सुखावले.

दर वर्षी साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र, मागील काही वर्षांपासून पाऊस विलंबाने दाखल होत आहे. यंदाचा जूनही त्याला अपवाद राहिलेला नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण असतानाही पाऊस पडत नव्हता. जून संपत आल्यावर पावसाने हजेरी लावली आहे. दोनच दिवसांपूर्वी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या होत्या.

भोसरीत घरांमध्ये पाणी
भोसरी - शहरात गुरुवारी (ता. २७) झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले. पावसाचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्यावरचे तळे साचले होते. इंद्रायणीनगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना घडली.

गुरुवारी (ता. २७) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचून रस्त्यावर तळे साचले होते. त्यातून जाणाऱ्या वाहनांमुळे पाणी उडत होते. येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलावरील पाण्याचा निचरा होण्याची वाहिनी रस्त्यावर सोडल्याने पाणी वाहत होते. चक्रपाणी वसाहत, दिघी रस्ता, गंगोत्री पार्कमधील सीएमई सीमाभिंतीजवळील रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील चौक, भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळील रस्ता, पीसीएमसी चौक, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील प्लॉट क्रमांक एकशे एक ते सुंदरम रेसिडेन्सीपर्यंतचा अंतर्गत रस्ता, संतनगर बसथांबा, मिनीमार्केट मुख्य चौक, भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक १९६ वेलमेड कंपनीसमोरील रस्ता, पेठ क्रमांक सातमधील माने ट्रान्सपोर्टसमोरील रस्ता आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. 

इंद्रायणीनगरमधील राजवाडा इमारत क्रमांक बारामधील तळमजल्यावरील चार सदनिकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ झाली. महापालिकेचे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, पाणी वाहून जाण्यासाठी वाहिनी टाकण्याची मागणी वाबळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Pimpri City