टेमघर धरण परिसरात धो धो पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

यंदा सर्वत्र पावसाचा मुक्काम वाढलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुक्काम वाढलेला आहे. टेमघर धरणात यंदा दोनशे टक्के पाऊस झालेला असून, हे धरण दोन वेळा भरले असते.

खडकवासला - यंदा सर्वत्र पावसाचा मुक्काम वाढलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुक्काम वाढलेला आहे. टेमघर धरणात यंदा दोनशे टक्के पाऊस झालेला असून, हे धरण दोन वेळा भरले असते. 

टेमघर धरण मुठा नदीवर १९९० च्या दशकात बांधले, त्याची क्षमता ३.७१ टीएमसी आहे. येथे सरासरी दोन हजार ४०० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा चार हजार ७७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे १९९.०४ टक्के पाऊस झाला आहे. सध्या धरण १०० टक्के भरले असून उरलेले ३.३९ टीएमसी पाणी धरणातून मुठा नदीत सोडले आहे, असे पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.

टेमघर यंदा ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता १०० टक्के भरले होते. त्या वेळी, या धरणात एक जूनपासून तीन हजार २०० मिलिमीटर पाऊस पडला होता.  दरम्यान, टेमघरचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले, त्यानंतर त्यातून पाणीगळती होत असल्याचे लक्षात आले.

२०१६-१७ मध्ये या धरणाच्या गळतीचे प्रमाण जास्त असल्याने ते धरण १०० टक्के क्षमतेने भरले नव्हते. सध्या दुरुस्तीचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. ९० टक्के गळती थांबली आहे, त्यामुळे दुरुस्तीनंतर यंदा धरण १०० टक्के भरले, अशी माहिती भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Temghar Dam Area