उरुळी कांचनमधील नागरिक रात्रभर रस्त्यावर

pani
pani

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण, ओढ्यात वाढलेली जलपर्णी, तर दुसरीकडे ठिकठिकाणी ओढा बंदिस्त करण्याचा फटका सोमवारी (ता. 23) मध्यरात्री उरुळी कांचन गावाला बसला. उरुळी कांचन व परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. तर पावसाचे पाणी अनेक घरांत शिरल्याने, सोमवारची रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली.

उरुळी कांचन गावाच्या मध्यभागातून डाळिंब रस्ता ते रेल्वे पूल असा सुमारे दीड किलोमीटर अंतराचा ओढा वाहतो. मागील काही वर्षांत ओढ्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे व बांधकामे झाली आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी वाळू वाहतूकदारांनी वाळू धुतल्याने ओढ्यात मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. त्यातच ग्रामपंचायतीने ओढ्याची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे ओढ्याचा प्रवाह अरुंद झाला आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्या कारकिर्दीत सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करून, सात वर्षांपूर्वी ओढ्यामध्ये मोठ्या आकाराची पाइपलाइन टाकून ओढा बंदिस्त करण्याची योजना राबवली होती. पावसाळ्यापूर्वी ओढ्याची साफसफाई करण्याची गरज असताना, ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने वरील परिस्थिती उद्‌भवली होती.

उरुळी कांचन व परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. डाळिंब रस्त्यावरून ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले. मात्र, ओढा अरुंद झाल्याने पावसाचे पाणी थेट घरांत शिरले. तर महात्मा गांधी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आले. ओढ्यातील पाणी थेट रस्त्यावर आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे भवरापूर, टिळेकरवाडी, नायगाव, कोरेगाव मूळ या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथून होणारी वाहतूक सकाळी अकरापर्यंत ठप्प झाली होती.
पुणे-सोलापूर महामार्गालगतची इरिगेशन कॉलनी ते महात्मा गांधी शाळा तसेच सोलापूर महामार्गावरील तळवडी चौकातून येणारा ओढा बाजार मैदान येथे एकत्रित झाला आहे. दोन्ही ओढ्याचे एकत्र झालेले पाणी ओढ्यालगतच्या सायरस पूनावाला शाळेमध्ये पाणी शिरल्यामुळे शाळेला एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली.

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष...
उरुळी कांचन बाजारपेठ व रस्ते पाण्याखाली जाण्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ओढ्यामधील घाण साफ न करणे, जलपर्णी काढणे ही कामे न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे. ओढ्याची साफसफाई करण्याची मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांचाही संपर्क होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com