पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची दमदार हजेरी...

rain
rain

पुणे : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.   

वालचंदनगर  : इंदापूर तालुक्‍यामध्ये सोमवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली असून, शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. भवानीनगर, सणसर, बेलवाडी, लासुर्णे, जंक्‍शन, वालचंदनगर, कळंब, अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, निमसाखर, निरवांगी परिसरामध्ये जोराचा पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले होते. जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या आशा पल्लवित झाला आहेत. सणसर परिसरामध्ये 55 मिलिमीटर, अंथुर्णे परिसरामध्ये 24 मिलिमीटर, निमगाव केतकी 62 मिलिमीटर व बावडा परिसरामध्ये 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लासुर्णे येथील बारामती-इंदापूर राज्यमार्गालगत अतिक्रमण झाल्याने नैसर्गिक स्रोतांना (चारी) अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील सुमारे 25 घरांमध्ये सोमवारी पहाटे पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.  

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब
 
वडापुरी : इंदापूर तालुक्‍यातील शेटफळ हवेली, वडापुरी, काटी, रेडा, रेडणी, अवसरी, बाभूळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दमदार पाऊस झाला. शेतात पाणीच पाणी झाले असून ओढे नाले वाहू लागले आहेत.
 
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरामध्ये तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये पावसाळा सुरु झाल्यापासून म्हणावा असा एकही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र, तीन दिवसापासून जो पाऊस पडत आहे, त्या पावसामुळे नदीसह ओढे-नाले खळखळून वाहत आहेत. त्यामुळे या पावसाचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.  

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे आज सायंकाळी पावसाचे मोठया प्रमाणावर पाणी नगर हमरस्त्यावर साठल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबवर रांगा लागून दोन तास प्रचंड वाहतुक कोंडी झाली. या खड्ड्यांमुळे वाहनांच्या नुकसानी बरोबरच खड्यांमध्ये पडुन जायबंदी झालेले अनेक जण प्रशासना विरोधात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.
 
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाचीसह पूर्व हवेलीला सोमवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपले. परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला होता. उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवने, आळंदी म्हातोबाची या गावांत पावसाचा जोर जास्त होता. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव, कदमवाकवस्ती व थेऊर परिसरात इतर गावांच्या तुलनेत पाऊस कमी होता. उरुळी कांचनमध्ये नागरीवस्तीत पाणी शिरल्याने रहिवांशाचे मोठे हाल झाले. परिसरात अतिक्रमण झाल्याने ओढ्याची रुंदी कमी झाली आहे. तसेच, रस्त्याच्या बाजुला असलेल्या कालव्याच्या पाटचाऱ्या प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्यांनी बुजविल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग न सापडल्याने हे पाणी नागरी वस्तीत शिरले. दत्तवाडी परीसरातील मूर्ती उद्योगाला पावसाचा मोठा फटका बसला. 

आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात खरिपाच्या पेरण्या उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पावसाची प्रतीक्षा आज झालेल्या पावसाने काही अंशी संपवली. आदिवासी भागात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले. पाऊस पडण्याची चिन्हे नसल्याने पेरणीचा हंगाम वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आज मीना नदीच्या व कुकडी नदीच्या खोऱ्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजाची चिंता काही अंशी मिटण्यास मदत झाली आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. आदिवासी भागात भाताची रोपे तरारली असून आवणीसाठी भात उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आज झालेल्या पावसाने भातशेतीच्या कामांना वेग येणार आहे. 

खळद : पुरंदर तालुक्यातील खळद परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला असून, खरीपाच्या झालेल्या पेरण्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दोन ते तीन दिवस या भागात प्रचंढ उकाडा जाणवत होता. मात्र, पाऊस हूलकावणी देत होता. आज दुपारपासून पावसाच्या दोन तीन सरी या भागात झाल्या. त्यामुळे सर्वत्र शिवार जलमय झाला असून, खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, वाटाणा, घेवडा, मटकी, तुर, काराळे, सुर्यफुल, सोयाबीन या सारख्या पिकांना याचा मोठा फायदा झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे सासवड- जेजुरी पालखी महामार्गावर प्रवाशांचीही मोठी धांदल उडाली तर मेंढपाळांना मात्र निवारा शोधण्यासही वेळ मिळाला नाही.

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरासह आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, हरणी परिसरामध्ये आज पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अर्ध्या तासाहुन अधिक काळ झालेल्या पावसाने परिसर जलमय झाला. पावसाने डोंगरमाळरातून पाणी वाहिल्याने शेतशिवारांमध्ये पाणी येऊन शेतामध्ये तळी तयार झाली आहेत. बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचुन राहिल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. काल पहाटे पाऊस झाला होता. आज दुपारपासुन दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र शिवार जलमय झाला असून, खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तूर आदी पिकांना याचा मोठा फायदा झाला. हरणी येथील टकमक ताल परिसरातील नारायण यादव, दादासाहेब यादव, विलास यादव, धर्मराज यादव, रामचंद्र यादव, बाळासाहेब खोमणे आदी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डोंगरमाळरानातील पाणी शिरल्याने शेतातील मातीसह बियाणे वाहुन गेल्याने जवळपास पंधरा एकर क्षेत्राला मोठा फटका बसला. तसेच, येथील नारायण बाबासाहेब यादव यांच्या पाऊण एकर उभ्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये तालीचे पाणी शिरल्याने ऊस शेताचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 

राहू : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात राहू बेट परिसर, पिंपळगाव, खुटबाव, देलवडी, नाथाचीवाडी, लडकतवाडी, उंडवडी परिसरात परिसरात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसात नंतरही संततधार पाऊस सुरुच होता. राहू बेट परीसरात काल सायंकाळी पण दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. पुन्हा आजही उशिरापर्यंत  पाऊस  सुरू असल्याने  शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजरीच्या पीकांसाठी तसेच आडसाली ऊस लागवडीचया पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे  शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. खुटबाव नजीक राहू- खुटबाव रस्त्यावर पावसामुळे शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. परिसरातील ओढ्यांना पूर आल्याने ते खळखळून वाहत होते. त्यामुळे रस्त्यावरील  वाहतूक संथ गतीने सुरू होती. दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील ओढे-नाले खळखळून वाहत आहे. शेतांमध्ये आणि ठिकाणी बांधबंदिस्ती फुटली असून मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलेले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com