नको रे बाबा! पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करताय, मग हे वाचा (Video)

महेंद्र शिंदे
रविवार, 19 जानेवारी 2020

फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा
खेड-शिवापूर टोल नाक्यावर  फास्टॅग वाहनांसाठी नऊ मार्गिका आहेत. मात्र रविवारी फास्टॅग मार्गिकेतूनच इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.

खेड-शिवापूर : मांढरदेवी तसेच परीसरातील वेगवेगळ्या यात्रांना जाणाऱ्या भाविकांची गर्दी आणि रविवारची सुट्टी यामुळे आज सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. खेड-शिवापूर टोल व्यवस्थापनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे टोल नाक्यावर आज सकाळपासून वाहनांची दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत मोठा वेळ वाया जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मांढरदेवी तसेच परीसरातील कोंढणपूर, कांजळे, हातवे, वांगणी आदी ठिकाणच्या यात्रा सुरु आहेत. रविवारची सुट्टी साधून पुण्यातील अनेक नागरीक या यात्रांसाठी जातात. त्यामुळेच आज सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. त्याचा परीणाम खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यापासून कोंढणपूर फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दर रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता टोल व्यवस्थापनाने टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी कोणतेही नियोजन केले नसल्याचे दिसून आले. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना सुमारे अर्धा तास वेळ लागत होता. 

खेड-शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांची कायम गैरसोय होते. त्या गैरसोईकडे प्रशासन आणि पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे, आम्ही किती दिवस टोल नाक्यावर वेळ वाया घालवायचा? अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत होते.

फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा
खेड-शिवापूर टोल नाक्यावर  फास्टॅग वाहनांसाठी नऊ मार्गिका आहेत. मात्र रविवारी फास्टॅग मार्गिकेतूनच इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टॅग यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy traffic on pune satara highway near khed shivapur