सक्‍तीनंतर हेल्मेटवापरात ४ टक्केच वाढ

सक्‍तीनंतर हेल्मेटवापरात ४ टक्केच वाढ

पुणे - हेल्मेटसक्तीची घोषणा होऊनही हेल्मेट वापरणाऱ्या पुणेकरांचे प्रमाण केवळ ३२ टक्‍क्‍यांच्या आसपासच रेंगाळले असल्याचे वास्तव परिसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अनेक अपघातात वाहनचालकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे बळी जात असल्याचे स्पष्ट झाले असतानाही हेल्मेटवापराला अनेक पुणेकरांकडून धक्कादायकरीत्या विरोध होतो आहे, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.

‘परिसर’ने शहरातील प्रमुख अकरा चौकांमध्ये वाहतूक सुरू असतानाची नमुनेदाखल छायाचित्रे घेतली. ही छायाचित्रे मे आणि डिसेंबर २०१८ अशा दोन टप्प्यांत गर्दीच्या वेळेला आणि गर्दी नसताना घेण्यात आली. मे मध्ये एकूण ४९१९ वाहनांच्या ४८२ छायाचित्रांचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यात एकूण ५७९७ दुचाकीस्वारांपैकी १३६२ जणांनी म्हणजे केवळ २८ टक्के वाहनचालकांनीच हेल्मेट परिधान केल्याचे आढळून आले. त्यानंतर ‘जानेवारीपासून हेल्मेटसक्ती होणार,’ अशी घोषणा झाल्यावर डिसेंबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३७५९ दुचाकीस्वारांपैकी १०२४ जणांनी हेल्मेट परिधान केले होते. विश्‍लेषण केल्यावर हेल्मेट परिधान करणाऱ्यांची संख्या केवळ चार टक्‍क्‍यांनी वाढून ती ३२ पर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले. यावरून वाहनचालकांची हेल्मेटबाबतची उदासीनता दिसते, मात्र हेल्मेटसक्तीची कसून अंमलबजावणी केली, तर हेल्मेट वापराकडे कल वाढेल, असे मत ‘परिसर’चे संदीप गायकवाड यांनी नोंदविले.

हेल्मेटबाबतच्या मेमध्ये केलेल्या सर्वेक्षणात दुचाकीवर मागे बसलेल्या ८७४ पुणेकरांपैकी केवळ १० जणांनी हेल्मेट परिधान केले होते. ते प्रमाण अवघे १.१ टक्का होते, तर डिसेंबरमध्ये ५९८ जणांपैकी केवळ २४ जणांनी हेल्मेट घातले होते. याचाच अर्थ दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट परिधान  करण्याचे प्रमाण केवळ ४.१ टक्‍क्‍यांपर्यंतच वाढले.

 हेल्मेटचा वापर किती होतो आहे, याबाबतचे सर्वेक्षण आम्ही पुन्हा येत्या सहा महिन्यांत करणार आहोत. पोलिसांनी आपली मोहीम सुरू ठेवली, तर हेल्मेटच्या वापरात वाढ होईल. रस्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिएतनामने गंभीरपणे घेतला. त्यामुळे तेथील नियमपालनाचे प्रमाण ६ वरून ९० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.
- संदीप गायकवाड, परिसर

 वाहतूक पोलिस विभागाने आता कालबद्ध उद्दिष्ट ठरवले पाहिजे. हेल्मेट परिधान करण्याचे प्रमाण १०० टक्‍क्‍यांच्या जवळ पोहोचेपर्यंत शहरातील अपघातांतील बळींच्या संख्येत लक्षणीय घट होणार नाही. दुचाकींच्या प्राणघातक अपघातांची २०१८ च्या पहिल्या दहा महिन्यांतील संख्या १८४ होती. ती येत्या दोन वर्षांत ५० टक्‍क्‍यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठरवले पाहिजे.
- रणजित गाडगीळ, प्रकल्प संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com