कोकणची बत्ती पेटविण्यासाठी बारामती- केडगावकरांची झुंज 

मिलिंद संगई
Wednesday, 24 June 2020

पावसात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीजयंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र, चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत. 

बारामती (पुणे) : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी महावितरणच्या बारामती व केडगाव विभागातील 16 अभियंते व कर्मचारी संततधार पावसात कोकणातील हर्णे बंदर (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.
      

आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड    

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा गेल्या 3 जून रोजी कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यातील वीजयंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7800 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते.

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनीही कसली कंबर

त्यानुसार बारामती परिमंडलाकडून बारामती व केडगाव विभागातील दोन कनिष्ठ अभियंता व 14 जनमित्र दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील पालंदे व कुडवळे गावात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. पावसात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीजयंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र, चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत. 

सकाळमुळे वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारे हिला मिळाला मदतीचा हात

समुद्रकिनारी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसल्याने हर्णे बंदर व इतर गावातील सुमारे 95 टक्के वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये नवीन वीजखांब रोवणे, वीजतारा ओढणे, खड्डे करण्यापासून वीजखांबांची खांद्यावरून वाहतूक करण्यापर्यंत सर्व कामे महावितरणचे कर्मचारी करीत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पथकांमध्ये कनिष्ठ अभियंता रोहित राख (बारामती) व पप्पू पिसाळ (केडगाव) तसेच रमेश गोडसे, इस्माईल सय्यद, पोपट खोसे, शैलेंद्र धाईंजे (सर्व बारामती), अजेश काळे, गोरख गावडे, अमित पवार, नितीन भापकर, मनोहर शेळके, नितीन मेंगावडे, दशरथ वाळसे (सर्व केडगाव) यांचा समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल स्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारणीचे प्रयत्न करणाऱ्या या सर्वांचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी कौतुक केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from Baramati to improve power supply in Konkan