जातीपातीच्या भिंती तोडून निराधार आजीबाईंना दिले मायेचे "छत'

SHANTABAI
SHANTABAI

नारायणगाव (पुणे) : कौटुंबिक कलहामुळे अनेकदा पोटच्या मुलांना वृद्ध आईवडील नकोसे वाटतात. त्यामुळे काही ज्येष्ठांना वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो, तर काहींना कौटुंबिक छळ सहन करावा लागतो. अशाच एका ज्येष्ठ महिलेला जुन्नर तालुक्यातील नागरायणगाव येथील काही तरुणांनी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन कोणतेही नाते नसताना आधार देत जगण्याची नवी उमेद दिली आहे. निराधार आजींची या तरुणांनी केवळ राहण्याचीच व्यवस्था केली असे नाही, तर त्यांना वैद्यकीय उपचारही मिळवून दिले. 

शांताबाई भीमाजी थोरात (वय 82) असे या आजींचे नाव. त्यांचे मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील वळती हे आहे. त्या अविवाहित असून, स्वामी समर्थ भक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या नारायणगावातील पेठ आळीत वास्तव्यास होत्या. वृद्धापकाळामुळे काम होत नसल्याने परिसरातील मंदिरात त्या राहात. सामाजिक कार्यकर्त्या व माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर या आजींना दोन वेळच्या जेवणाचा डबा देतात. देवदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांकडे त्या राहण्यासाठी घर मिळावे, अशी याचना करीत. 

समाजिक कार्यकर्ते मुन्ना काझी यांनी दीड वर्षांपूर्वी आजींची भेट घेतली. या वेळी आपण निराधार असून, कोणी नातेवाईक नसल्याची माहिती आजींनी दिली. राहण्यासाठी निवारा मिळावा, अशी अपेक्षा आजींनी काझी यांच्याकडे व्यक्त केली. काझी व त्यांच्या मित्रांनी आजींचा राहण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय घेतला. पाणी व इतर सुविधा असलेली दरमहा एक हजार रुपये भाडे असलेली खोली या तरुणांनी आजींना दिली. या खोलीचे भाडे मागील पंधरा महिन्यांपासून काझी व त्याचे मित्र निखिल गाडगे, अनिकेत दिवेकर, दिनेश भंडारे, शुभम जंगम, यशवंत कानडे, विष्णू बिडवई, समाधान रासकर, नीलेश यादव, सिद्धेश रासकर, सुमित शिंदे, राकेश नाईक, सनी जंगम हे वर्गणी काढून भरत आहेत. 

हे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून बहुतेक जण बेरोजगार आहेत. येथील डॉ. लहू खैरे हे आवश्‍यक तेव्हा आजींवर मोफत वैद्यकीय उपचार करतात. त्यामुळे आजींची तब्बेत ठणठणीत आहे. चरितार्थ चालविण्यासाठी बोरकर यांनी शासकीय निराधार योजनांचा लाभ मिळवून दिल्याची माहिती आजींनी दिली. डोक्‍यावर छत्र आणि पोटाला अन्न मिळाल्यामुळे आजींचा वृद्धापकाळ सुकर झाला आहे. 

राहायला घर मिळावे, यासाठी आजींनी बऱ्याच जणांकडे मदतीची याचना केली. मात्र कोणी प्रतिसाद दिला नाही. दीड वर्षापूर्वी त्या पावसात भिजत होत्या. त्या वेळी मी त्यांची चौकशी केली. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मी अस्वस्थ झालो. दानपेटीत दान करण्यापेक्षा गरजू आजींना मदत म्हणजे परमेश्वराला मदत या भावनेतून मी व माझ्या मित्रांनी त्यांना राहण्यासाठी घर मिळवून दिले. 
- मुन्ना काझी, सामाजिक कार्यकर्ते 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com