माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलामुळे वाचले दोघांचे प्राण

डॉ. संदेश शहा
Friday, 14 August 2020

राजवर्धन पाटील हे मदनवाडी (ता. इंदापूर) येथील एका लग्नसमारंभासाठी चालले होते. त्यांची गाडी पळसदेव व काळेवाडी दरम्यान आली असताना त्यांना महामार्गावर लोकांची गर्दी दिसली.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोघांना नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी गोल्डन मिनिट्समध्ये रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

राजवर्धन पाटील हे मदनवाडी (ता. इंदापूर) येथील एका लग्नसमारंभासाठी चालले होते. त्यांची गाडी पळसदेव व काळेवाडी दरम्यान आली असताना त्यांना महामार्गावर लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. त्यावेळी एका चारचाकी गाडीने एका दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी होऊन रस्त्यावर विव्हळत पडलेले त्यांना दिसले. रस्त्यावर रक्त सांडले होते. बघ्यांची भरपूर गर्दी झाली होती. काही जण मोबाईलने शूटिंग करत होते. मात्र, अपघातातील जखमींच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, राजवर्धन पाटील यांनी क्षणाचा देखील विचार न करता त्या दोघांना आपल्या गाडीत घेतले. तसेच, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पराग जाधव यांना फोन करून तातडीची वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यास सांगितले. त्यामुळे जेव्हा गाडी भिगवण येथील थोरात रुग्णालयात पोहोचली, त्यावेळी डॉक्टरांच्या सज्ज टीमने दोन्ही जखमींवर तातडीने उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. राजवर्धन पाटील यांची समयसूचकता व माणुसकीचे कौतुक होत आहे.

यासंदर्भात राजवर्धन पाटील म्हणाले की, अपघात झाल्यानंतर जखमी किंवा अपघात पहायला नागरिक गर्दी करतात, मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी तातडीने पुढे येणे गरजेचे आहे. कारण, गोल्डन मिनिट्समध्ये उपचार सुरू झाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास आधार मिळेल.            - राजवर्धन पाटील, संचालक,                                     नीरा- भीमा सहकारी साखर कारखाना             

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from the son of former minister Harshvardhan Patil to the injured in the accident at Indapur