Hepatitis Day : जंकफूड यकृतासाठी ठरतेय धोक्याची घंटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liver
Hepatitis Day : जंकफूड यकृतासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

Hepatitis Day : जंकफूड यकृतासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

पुणे - प्रख्यात माहिती तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता रमेश वयाच्या पस्तीशीतील उमदा मुलगा. कंपनीतील कामगिरीबद्दल सलग तीन वर्षे बक्षीस मिळाले. पूर्णतः निर्व्यसनी असणाऱ्या मुलाला यकृताचा आजार झाला. त्याला निमित्त ठरलं ते ‘फॅटी लिव्हर’चं. यकृताचा काही भागच कार्यरत आहे. त्याच्यावर तो जगतोय. पुढच्या टप्प्यात यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला दिला...आता तो एकीकडे आयुष्याची गोळाबेरीज करतो आहे तर, दुसरीकडे प्रत्येक दिवशी आयुष्याची लढाई लढतो आहे.

हे एका रमेशचे फक्त उदाहरण आहे. असे अनेक रमेश सध्या आपल्या पाहण्यात आहेत. त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. वडापाव, पिझ्झा, बर्गर, शीतपेये अशा चुकीच्या आहाराची लागलेली गोडी. त्यामुळे तुम्ही वयाच्या विशी-पंचविशीत असाल. पोटाची घेर, वजन मोठ्या प्रमाणात वाढले असेल आणि त्याच्या जोडीला मद्यपान असल्यास ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची पहिली घंटा आहे, हे निश्चित! कारण, आता लगेच तुम्हाला काही होणार नाही. मात्र, पुढील पाच, दहा, पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला यकृताचा आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे ‘फॅटी लिव्हर’ काहीच नाही, म्हणून आज दुर्लक्ष करू नका, नाहीतर उद्या तुम्हाला काहीच करता येणार नाही, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या काविळींबाबत जनजागृती करण्यासाठी जगभर २८ जुलै हा जागतिक हिपॅटायटिस दिन म्हणून पाळला जातो. ‘हिपॅटायटिसचे उपचार तुमच्याजवळ’ ही यंदाच्या हिपॅटायटिस दिनाची संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांनी हा सल्ला दिला.

अवयवांमध्ये साचत असलेली चरबी किंवा फॅटी लिव्हर हे भविष्यातील लिव्हर सोरॅसिसचे मुख्य कारण म्हणून पुढे येईल. त्या पाठोपाठ कर्करोग वाढण्याचा धोका सध्या दिसत आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये अवयवांमध्ये साचलेली चरबी हे यकृत प्रत्यारोपणामागचे प्रमुख कारण म्हणून पुढे येत आहे.

- डॉ. नितीन पै, संचालक, गॅस्ट्रोएंन्टेरोलॉजी विभाग, रूबी हॉल क्लिनिक

लक्षात ठेवा

अभंगातील उपदेश...

तुकाराम महाराज म्हणतात, ‘माशी अन्न जिरू देत नाही. ती आपल्या संसर्गाने अन्नही आपल्यासारखंच घाण करते.’ ‘दुधाने भरलेल्या घागरीत मद्याचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध शुद्ध राहत नाही.’ हा उपदेश सर्वांनी आज लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण याचा आपल्याला विसर पडला आहे. आपली जीवनशैली बिघडत चालली आहे. खास करून ‘फॅटी लिव्हर’कडे होणारे दुर्लक्ष धोकादायक आहे. म्हणून खाण्या-पिण्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला सल्ला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याबाबत आपल्या सूचना व प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

हीच वेळ...

तुमच्या जवळच्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तुम्हाला फॅटी लिव्हर असल्याचे सांगितले असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः १८ ते २५ वर्षे या वयोगटातील तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचे वाढणारे प्रमाण काळजी करायला लावणारे आहे. कारण, पुढील पाच ते पंधरा वर्षांमध्ये फॅटी लिव्हरमधून होणारी गुंतागुंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वतःला यापासून दूर ठेवण्याची हीच वेळ आहे, हे स्पष्ट आहे.

कसे होते यकृत लठ्ठ

रक्तातील चरबी हळूहळू यकृतामध्ये जाते. त्यातून यकृताला सूज येते. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘फॅटी लिव्हर’ म्हणतात. या टप्प्यापासून यकृत कडक होण्याची प्रक्रिया सुरू होते.

आजच करा सुरुवात

फॅटी लिव्हर रोखण्याची सुरुवात आजपासूनच करणे आवश्यक आहे. कारण, आतापर्यंत यकृताचे झालेले नुकसान पुन्हा भरून येणार नाही. मात्र, यापुढे होणारे नुकसान रोखता येऊ शकते.

आजार वाढण्याची कारणे

शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींच्या हालचाली मंदावल्या आहेत. फिरण्यासाठी वाहन वापरणे, घरात बसून तासनतास अभ्यास करणे, व्हीडिओ गेम खेळणे, ऑनलाइन क्लासेस, स्पर्धा परीक्षा या चक्रात अडकलेल्या मुले-मुलींमध्ये हा विकार वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यातही दारुचे व्यसन किंवा लठ्ठपणा आणि काविळसारखा आजार झाल्यास हा आजार बळावण्याचा धोका असतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

काय आणि कसे होते?

लठ्ठ असलेल्या बहुतांश रुग्णांना चयापचयाशी संबंधित आजार असण्याचा संभव असतो. तसेच, आपल्या देशातील नागरिकांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढलेले असते. त्यातून यकृत कडक होते आणि पुढे लिव्हर सोरॅसिस होण्याची शक्यता वाढते.

Web Title: Hepatitis Day Junkfood Liver Danger Health Sickness

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..