ध्येयवादी यशस्वी युवा उद्योजक : सागर ऊर्फ युवराज अहिवळे

Sagar-Ahiwale
Sagar-Ahiwale

वडील पोलीस खात्यात असल्याने शिवाजीनगर पोलीस वसाहतीत जन्म व बालपण गेले. शेजारीच माॅडर्न शाळा असल्याने शिक्षण तिथेच पूर्ण केले.शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना सरकारी नोकरी न मिळाल्याने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिवाजीनगर येथे सीएनजी पंपावर कामाला लागलो. पंपावर काम करत असतानाच रितीका विनायक निम्हण यांच्याशी विवाह झाला.

२०१४ मध्ये कन्या श्रीशा हीचा जन्म झाला व याच काळात पंपावरची नोकरीही सुटली व यानंतर कुटुंबाची जबाबदारी अधिक वाढली. नोकरीच्या शोधात असतानाच एका नामांकित आयटी कंपनीची संगणकीय उपकरणे इतर कंपन्यांना पुरवठा करण्याचे काम सुरू केले. तिथे बऱ्यापैकी पगार मिळायला लागला होता; परंतु ज्या कंत्राटदाराकडे कामाला होतो त्यांचे कंत्राट संपल्याने ती नोकरीही सोडावी लागली. त्यानंतर जवळपास दोन वर्षे नोकरीविना घरीच काढावे लागले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानंतर सगळा घरखर्च आई- वडिलांकडूनच केला जात होता. वडील आधीच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या पेन्शनवर कुटुंबाचा खर्च चालवला जात होता. दोन वर्षे घरी राहिल्यानंतर स्वतः काहीतरी करायला पाहिजे हे विचार सतत डोक्यात येत होते; परंतु हातात पैसा नसल्याने सगळे मार्ग बंद होते. यानंतर एके दिवशी आईने दहा हजार रुपये दिले व काहीतरी व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. याच कालावधीत आईचे निधन झाले व या दुर्घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला. यानंतर पुन्हा एकदा काही तरी करण्याचे स्वप्न विरुन गेले. जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी घरीच असल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले असल्याने वडिलांनी थोडी आर्थिक मदत केली व पुन्हा नवा व्यवसाय करण्यास सांगितले. मित्रमंडळी व काही अनुभवी सहकाऱ्यांनी नोंदणीकृत फायनान्स कंपनीची स्थापना केली. यानंतर समाजातील गरजूंना सरकारी नियमानुसार पतपुरवठा करून अनेक जणांच्या समस्या सोडवण्यात हातभार लावला. 

२०१६ मध्ये दहा हजार रुपयांत सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल आई- वडिलांच्या आशीर्वादाने आज कोटींच्या घरात आहे. अनेक जणांना मुलांचे शिक्षण, विवाह किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासाठी तत्परतेने साहाय्य केले. याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, आई कमल अहिवळे हिच्या स्मरणार्थ सोफोशमधील बालकांना धान्य व किराणा साहित्याची मदत यांसारख्या सामाजिक उपक्रमातही पुढाकार घेतलेला आहे.

कोरोनाची साथ पसरल्यानंतर अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली होती. अशा पाचशे कुटुंबांना धान्याचे कीट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. वडील दयानंद अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ विशाल अहिवळे, वहिनी शिल्पा अहिवळे यांच्यासह आम्ही कुटुंबीय आजही एकत्रित राहतो, याचेही मोठे समाधान आहे. समाजातील कुठलाही घटक मागे राहू नये किंवा आर्थिक अडचणीमुळे कुणाचे शिक्षण अर्धवट राहू नये, विवाह रोखले जाऊ नये यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल्याने अनेकांच्या संसारात आनंद फुलण्याचे काम केले आहे. इतरांच्या सुखात आपले सुख मानून मार्गक्रमण करण्याच्या आई -वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा वारसा घेऊन पुढे जाणे हेच ध्येय बाळगून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. समाजातील अडचणीत असलेल्या घटकांना जमेल तेवढी मदत करण्यासाठी आपले सामाजिक कर्तव्य समजून प्रत्येकाने पुढे यायला हवे, हाच आजच्या तरुण पिढीला माझा संदेश आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com