पुणेकरांची काहिली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुण्यात गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी तापमान बुधवारी (ता. 24) शिवाजीनगर येथे नोंदले गेले. कमाल तापमानाचा पारा 41.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला असून, पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

पुणे -  पुण्यात गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी तापमान बुधवारी (ता. 24) शिवाजीनगर येथे नोंदले गेले. कमाल तापमानाचा पारा 41.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला असून, पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. देशात मध्य प्रदेशातील खरगोन येथे सर्वाधिक म्हणजे 45.6, तर राज्यात अकोला येथे 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शहरात मंगळवारी (ता. 23) मतदानाच्या दिवशी उन्हाचा चटका लागत होता. कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली होती. सलग दुसऱ्या दिवशी उन्हाची काहिली पुणे शहर आणि परिसरात जाणवली. कमाल तापमानाने गेल्या पाच वर्षांमधील उच्चांक मोडला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अतिनील किरणांचा निर्देशांक 2 पर्यंत होता. तर, दुपारी तीन वाजेपर्यंत हा निर्देशांक 6.2 पर्यंत वाढल्याचे निरीक्षण भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील "सफर'तर्फे नोंदविण्यात आले. अतिनील किरणांचा हा निर्देशांक धोकादायक पातळीवर असल्याचेही संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात दुपारनंतर उन्हाचा चटका वाढू लागल्याने रस्त्यांवरील गर्दी कमी झाली होती. कामानिमित्त बाहेर पडलेले दुचाकीचालक डोळ्यांवर गॉगल, डोक्‍यावर टोपी, तोंडाला रुमाल, हातमोजे घालून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसत होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या थंडपेयविक्रीच्या दुकानांवर दुपारी गर्दी वाढली होती. 

का वाढले तापमान? 
शहर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आकाश निरभ्र आहे. हवामान कोरडे होते. त्याच वेळी विदर्भात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या सर्व वातावरणाचा प्रभाव पुण्यावर होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. 

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा 
विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले गेले. अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान 42 अंशा सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. तर जळगाव, मालेगाव, बीड, परभणी येथेही तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे आहे. त्यामुळे विदर्भात उद्या (ता. 25) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

चक्रीवादळाचा दक्षिण भारताला धोका 
बंगालच्या उपसागरात उद्या (ता. 25) श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन मंगळवारपर्यंत (ता. 30) श्रीलंका आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ तमिळनाडूकडे सरकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, दक्षिण तमिळनाडूकडून ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता असून, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

उष्माघात टाळण्यासाठी... 
हे करा 
- पुरेसे पाणी प्या. 
- फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. 
- उन्हात गॉगल, टोपी वापरा. 
- ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. 

हे करू नका 
- शक्‍यतो उन्हाच्या वेळी घराबाहेर जाणे टाळा. 
- कष्टाची कामे उन्हात करू नका. 
- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. 
- चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्‍स टाळा. 

Web Title: High temperature of five years in Pune