जुन्नरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

“गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भावात वाढ होत आहे. देशावरील मागणी वाढली असून लाल कांदा येण्याला अवधी असल्याने भावातील तेजी कायम राहू शकते. 15-20 नोव्हेंबरपर्यत उन्हाळी कांदा आवक राहील. लाल कांद्यालाही भाव टिकून राहण्याची चिन्हे आहेत.”

- सुशील व सारंग घोलप, व्यापारी

जुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोला 281 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. 

गेल्या बाजारात रविवारी ता.14 रोजी भाव वाढीमुळे आवक वाढ झाली. बाजारात 14 हजार 642 कांदा पिशवीची आवक झाली या कांद्यास प्रतवारीनुसार 70 ते 170 रुपये भाव मिळाला होता तर आठवड्यापूर्वी रविवारी ता.7 रोजी 10 हजार 46 कांदा पिशवीची आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार 50 ते 120 रुपये भाव मिळाला होता. 

बाजारात नवीन कांदा न आल्याने भावात अजून वाढ होऊन तीन हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी चाळीतून कांदा बाहेर काढला नाही. तालुक्यातील कांदा चाळीत सुमारे दोन ते तीन लाख टन कांदा साठविण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. यापैकी एक लाख टन कांदा अद्यापही शिल्लक असल्याचा अंदाज आहे.

अपुऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकाची वाट लागली असून याची तूट लाल काद्यातून भरून निघण्याची शक्यता मावळली आहे. अशात चाळीतला कांदा भाव वाढीच्या प्रतीक्षेत इतके दिवस चाळीतच गुदमरत आहे.  कांद्याची इतर राज्यांसह देशावर मागणी वाढल्याने जुन्या कांद्याचे दर तेजीत आले आहेत.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असले तरी चाळीत कांदा खराब होऊ लागल्याने सुमारे ७५ टक्के कांदा शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने विक्री केला आहे. आता सुमारे वीस ते पंचवीस टक्के उन्हाळी कांदा शिल्लक असून शेतकरी तो बाजारात आणू लागले आहे. भाव वाढले तरी अजूही देशातील बाजाराची माहिती घेऊन शेतकरी भावातील तेजीच्या प्रतीक्षेत कांदा विक्रीला काढत नसल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: The high value of onion in Junnar