मुख्यमंत्र्यांच्या सभेला टांग; मतदानाला मात्र रांग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांपैकी सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) मध्ये 62.51 टक्के; तर सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मध्ये 40.96 टक्के झाले आहे.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या पारदर्शक सभेचा अनुभव घ्यावा लागला होता. त्याच शनिवार-सदाशिव पेठ प्रभागात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरविणारे नागरिक कौल कोणाला देणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून यंदाच्या निवडणुकीत भाजपने युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर शनिवारी (18 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण, सभेला मोजून शंभर नागरिक उपस्थित असल्याने मुख्यमंत्र्यांना सभा न घेता पुढे जावे लागले होते. या सभेनंतर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी त्यांची पारदर्शक सभा अशी खिल्ली उडविली होती.

आता याच शनिवार-सदाशिव पेठेत 62.51 टक्के मतदान झाले आहे. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांपैकी सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) मध्ये 62.51 टक्के; तर सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-बालेवाडी-पाषाण) मध्ये 40.96 टक्के झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी शहरात मंगळवारी सुमारे 26 लाख 34 हजार 798 मतदारांपैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून तो यंदा 65 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले होते. त्याकरिता शहरभर मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीही करण्यात आली. तिला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला; तसेच मतदार याद्यांमधील गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र मतदानाचा टक्का फारसा वाढू शकला नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

शहरातील विविध तीन प्रभागांत 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. नऊ प्रभागांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; तर 29 प्रभागांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. उपनगरांतील बहुतेक प्रभागांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. 
शनिवार पेठ-सदाशिव पेठेपाठोपाठ कसबा पेठ-सोमवार पेठ (प्रभाग क्र. 16) मध्ये 61.31 टक्के मतदान झाले.

Web Title: highest voting in shaniwar-sadashiv peth prabhag