शांततेसाठी पाच हजार सहाशे किलोमीटर पदयात्रा !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

वयाच्या 59 व्या वर्षी योगेश मथुरिया यांची किमया

वयाच्या 59 व्या वर्षी योगेश मथुरिया यांची किमया
पुणे - जागतिक शांततेच्या प्रसारासाठी पाच हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास आणि तोही पायी, विश्‍वासच बसत नाही ना! पण हा खडतर प्रवास पूर्ण केला आहे वयाच्या 59 व्या वर्षी पुण्यातील योगेश मथुरिया यांनी. त्यांनी पुणे ते श्रीलंका प्रवास करून जिद्द असल्यास अशक्‍य गोष्टही साध्य करता येते, हेच दाखवून दिले आहे.

जागतिक शांतता दिनानिमित्त 21 सप्टेंबर 2016 रोजी मथुरिया यांनी या पदयात्रेला सुरवात केली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पायी प्रवास करण्याचा ध्यास घेतला. पुणे ते श्रीलंका दरम्यानच्या प्रवासाबद्दल मथुरिया म्हणाले, 'प्रवासादरम्यान अनेक लोकांशी भेटी झाल्या. काहींनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले, तर अनेकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले. काहींनी "या वयात कशाला हा मूर्खपणा करायचा?' असा खोचक प्रश्‍नही केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत माझा प्रवास चालूच राहिला. पुणे ते श्रीलंका दरम्यान मी महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, पॉंडिचेरी, कर्नाटक आणि गोवा अशा अनेक राज्यांतून प्रवास केला. रोज पहाटे चार वाजता चालायला सुरवात करायचो, दुपारी थोडी विश्रांती घेऊन परत सायंकाळी चालायला सुरवात करायचो, असा माझा दिनक्रम असायचा. 21 सप्टेंबर रोजी सुरू झालेला प्रवास 19 मार्च रोजी (180 दिवस) संपला.''

मुस्लिम कुटुंबीयांच्या पाहुणचाराने भारावलो
यात्रेत तेलंगण येथील सीमाभागातील एका गावात एका मुस्लिम कुटुंबीयांकडे मुक्कामास होतो. त्यांनी अतिशय आदरपूर्वक पाहुणचार केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबप्रमुखाने गावातील हिंदू मंदिरात नेऊन त्यांच्या गावातील स्थानिक प्रथेनुसार पूजा कशी करायची हेदेखील सांगितले. या प्रसंगाने मी अतिशय भारावून गेलो. मथुरिया यांनी यापूर्वी मुंबई ते वाघा सीमा, मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते पाकिस्तान असा पायी प्रवास केला आहे. 2020 पर्यंत सर्व दक्षिण आशियायी देशांपर्यंत पायी प्रवास करण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: Hiking for peace