मेट्रोला आधार ‘एचए’च्या जमिनीचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेटदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोसाठी ‘महामेट्रो’ने हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍सकडे (एचए) १६ एकर जमिनीची मागणी केली होती. ‘एचए’ने आपल्याकडील अतिरिक्त ८७ एकर जमीन नुकतीच विक्रीला काढली त्यातून मेट्रोला आवश्‍यक असलेली जमीन खरेदी करता येणार आहे. 

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेटदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोसाठी ‘महामेट्रो’ने हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍सकडे (एचए) १६ एकर जमिनीची मागणी केली होती. ‘एचए’ने आपल्याकडील अतिरिक्त ८७ एकर जमीन नुकतीच विक्रीला काढली त्यातून मेट्रोला आवश्‍यक असलेली जमीन खरेदी करता येणार आहे. 

पिंपरी ते स्वारगेटदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोला कारशेड उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्‍यकता भासणार आहे. अशी जागा पुण्यात उपलब्ध होणे कठीण आहे. मेट्रोला आवश्‍यक असणारी जागा ‘एचए’कडेच उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रोने त्या संदर्भातील प्रस्ताव कंपनीकडे दिला होता. त्यानंतर कंपनीने ‘म्हाडा’ला लावलेल्या प्रतिचौरस मीटर ४४ हजार ४०१ रुपये या दरानुसार जागा खरेदीची ऑफर दिली होती. मात्र, त्यानंतर मेट्रोकडून आतापर्यंत त्या संदर्भात कोणतेही उत्तर आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, ‘एचए’ने त्यांच्याकडील ८७.७० एकर अतिरिक्‍त जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन उपलब्ध असून, मेट्रोला लिलावाच्या माध्यमातून ती घेता येणे शक्‍य आहे. या ठिकाणी कारशेडबरोबरच डेपो आणि देखभालीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सोयीसुविधांची उभारणी करणे महामेट्रोला शक्‍य होणार आहे. ‘एचए’कडे असणारी अतिरिक्‍त जागा १७ भूखंडांमध्ये विभागल्याने आपल्याला सोईस्कर असणारी जागा मेट्रोला त्यामध्ये घेता येईल.  

पिंपरी ते स्वारगेट यादरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामापैकी पिंपरी ते रेंजहिल्स हा मार्ग एलिव्हेटेड राहणार असून, शिवाजीनगर ते स्वारगेटदरम्यानचा मार्ग भुयारी राहणार आहे. पिंपरी ते रेंजहिल्सदरम्यानची मेट्रो एलिव्हेटेड असणार आहे. त्यामुळे त्याची स्थानके वरच्या बाजूला असतील. स्थानकांची उभारणी करण्यासाठी मेट्रोला जागेची आवश्‍यकता असून त्यासाठी त्यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, स्थानकांसाठीच्या जागा अजूनही निश्‍चित झालेल्या नाहीत. 

कामाला लवकरच सुरवात 
मेट्रोच्या कामाला नाशिकफाटा चौकातून सुरवात होणार आहे. येत्या महिनाभरात या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. नाशिक फाटा ते पिंपरीदरम्यान जिओ टेक्‍निकल सर्व्हेचे काम सध्या वेगात सुरू आहे.

Web Title: hindustan antibiotics land