

हिंजवडी, ता. १९ : फेज-१ येथील ब्लू रिज टाउनशिपमधील द ग्रुव्हज सोसायटीतील एका नामांकित शाळेच्या अगदीजवळ दारूचे परमीट रूम सुरू झाल्याने शेकडो रहिवासी- पालक आक्रमक झाले आहेत. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे न घेताच हा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. १८) दुपारी रहिवाशांनी शालेय विद्यार्थ्यांसह दुकानाजवळ जोरदार निदर्शने केली.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एफएल-३ परवान्याच्या अटींनुसार भाड्याच्या जागेसाठी मालक तसेच संबंधित सोसायटीच्या सचिवाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, द ग्रुव्हज सोसायटीने कोणतेही ‘एनओसी’ दिलेले नाही. उलट, सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत परिसरात कोणत्याही प्रकारचा दारू व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न देण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा परिसर हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीत असल्याने ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीची आवश्यक ना हरकत घेतली का ?, याचीही चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. संबंधित यंत्रणांनी परवाना देताना नेमकी कोणती कागदपत्रे तपासली, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासक गणेश जांभुळकर, माजी सरपंच विद्यमान सदस्य विक्रम साखरे, शिवानी जांभुळकर, अभिषेक जांभुळकर यांनीही रहिवाशांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित आंदोलनात सहभाग घेतला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर.आर. कोळे, पुणे जिल्हाधिकारी, हिंजवडी ग्रामपंचायत आणि हिंजवडी पोलिस ठाण्याकडे रहिवाशांनी तब्बल पाचशेहून अधिक स्वाक्षऱ्यांसह रीतसर हरकती नोंदवल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांनाही रहिवाशांनी निवेदन दिले आहे.
केवळ दारू विक्री ?
‘एफएल-३’ परवाना रीतसर उपहारगृहासाठी दिला जातो. त्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा असणे अपेक्षित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित ठिकाणी स्वयंपाकघर अथवा प्रत्यक्ष अन्नसेवा नसून केवळ काउंटरवरून दारूविक्री केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.