‘आयटीयन्स’ची डोकेदुखी

सुधीर साबळे  
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे. 

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे. 

वाहतुकीची सद्यःस्थिती काय?  
चाकणकडून येणारा एक रस्ता तळवडे आयटी पार्क परिसरातून येतो. पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ओघ कायम असतो. त्यामुळे ट्रक, कंटेनरबरोबरच अन्य वाहने लवकर पोचण्यासाठी तळवडे आयटी पार्क परिसरातून येणाऱ्या रस्त्याचा वापर करतात. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बस तसेच दुचाकीस्वार अडकून पडतात. वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी अनेकजण चुकीच्या दिशेचा वापर करीत वाहने दामटतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होतात.

दुचाकीस्वारांकडून पदपथाचा वापर
आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी दुचाकीस्वार बिनदिक्‍कतपणे पदपथाचा वापर करत असतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, पोलिसांना कठीण जात आहे. 

या चौकांत असते कोंडी
तळवडे आयटी पार्कवरून येताना या रस्त्यावरील सोनावणे चौक, तळवडे गावठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस या ठिकाणची वाहतूक नियंत्रित करतात. मात्र, अनेकजण लवकर जाण्यासाठी विरुद्ध दिशेने येतात. या ठिकाणी काही भागातला रस्ता अरुंद आहे, तर काही ठिकाणचा रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडला आहे, याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर होत आहे.

कोंडी सोडविण्यासाठी हिंजवडीत आणखी बदल
हिं जवडीतील चक्राकार वाहतूक विनाअडथळा व्हावी म्हणून वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना शिवाजी चौकातून वाकड पुलाकडे जाण्यास बंदी केली आहे. या बदलामुळे आयटी कंपन्यांच्या बसेस आणि अन्य जड वाहनांना शिवाजी चौकात डावीकडे वळून कस्तुरे चौकात उजव्या बाजूने इंडियन ऑइल चौकातून जावे लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.

आयटी कंपन्या सुटल्यानंतर शिवाजी चौकात बसगाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अन्य वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून जड वाहनांना शिवाजी चौकाकडून वाकड पुलाकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. 

सध्या हिंजवडीमध्ये सुरू असणारा चक्राकार वाहतुकीचा बदल २४ ऑक्‍टोबरपर्यंत कायम राहणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबवीत असताना वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून इंडियन ऑइल पंप ते शिवाजी चौकदरम्यान डी मार्टजवळील पंक्‍चर, शिवाजी चौक ते फेज एक सर्कलदरम्यान असणारे पाच पंक्‍चर, फेज एक ते जिओमेट्रिक सर्कलदरम्यान असणारे सर्व पंक्‍चर आणि मेझा ए चौक ते शिवाजी चौकदरम्यान असणारे दोन पंक्‍चर बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. हिंजवडीमध्ये राबविण्यात येणाऱ्या चक्राकार वाहतुकीसंदर्भात नागरिकांनी २४ ऑक्‍टोबरपर्यंत लेखी स्वरूपात सूचना पोलिस आयुक्‍त कार्यालय, ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्क, पिंपरी या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन अप्पर पोलिस आयुक्‍त मकरंद रानडे यांनी केले आहे.

Web Title: Hinjewadi IT park area of traffic issue