अधिकाऱ्यांकडून वाहतूक कोंडीची पाहणी

हिंजवडी फेज टू - एमआयडीसी व पोलिस अधिकाऱ्यांना रस्त्यावरील अतिक्रमणे दाखवून देताना आयटीयन्स.
हिंजवडी फेज टू - एमआयडीसी व पोलिस अधिकाऱ्यांना रस्त्यावरील अतिक्रमणे दाखवून देताना आयटीयन्स.

हिंजवडी - हिंजवडी आयटी पार्कच्या वाहतूक कोंडीची कारणे व त्यावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी एमआयडीसी, ग्रामस्थ, आयटीयन्स व पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ५) दुपारी येथील रस्त्यांची व कोंडी होत असलेल्या ठिकाणांची पाहणी केली.

रस्त्यांवरील अतिक्रमणे व खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला. त्यामुळे एमआयडीसीच्या कार्यकक्षेत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करून पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्‍वासन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नीलेश मोढवे यांनी दिले. तसेच रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याचे ठरले. 

या पाहणी दौऱ्यात सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक शाखेचे निरीक्षक किशोर म्हसवडे, एमआयडीसीचे उपअभियंता प्रताप शिंदे, विठ्ठल राठोड, आयटीयन्स सुधीर देशमुख, ज्ञानेंद्र हुलसुरे, राहुल सोनवणे यांच्यासह हिंजवडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

येथील शिवाजी चौकातून पाहणी दौऱ्याला सुरवात करण्यात आली. पावसाळ्यानंतर हे खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात येतील असे आश्‍वासन मोढवे यांनी या वेळी दिले. एमआयडीसीच्या फेज एकमधील जयरामनगरहून ब्लू रिज टाउनशिपकडे गेलेला रस्ता एमआयडीसीने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून द्यावा. ग्रामपंचायत त्याच्यावर निधी खर्च करील, अशी मागणी या वेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

पालिकेच्या अधिकाऱ्यांची दांडी
या दौऱ्यात म्हाळुंगे ते हिंजवडी या प्रस्तावित रस्त्याच्या कामाची पाहणीदेखील करण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीच्या फेज दोन व तीनमध्ये मुख्य रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे आयटीयन्सनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या पाहणी दौऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित राहणार होते. मात्र, हे अधिकारी न आल्याने पाहणी दौरा उरकता घ्यावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com