हिंजवडीत वाहतूक कोंडी कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधल्या फेज वनमधील इन्फोसिस सर्कल ते माणदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जैसे थे आहे.

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधल्या फेज वनमधील इन्फोसिस सर्कल ते माणदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जैसे थे आहे.

आयटी पार्क परिसरातील शिवाजी चौक आणि भूमकर चौक परिसरात सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाकड चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. दरम्यान, वाकड चौक ते शिवाजी चौकदरम्यानच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे रस्ता खराब होत असतो. गेल्या दोन वर्षांपासून या त्रासात भर पडत आहे. हिंजवडीतील वाहतूक समस्येसंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत चर्चा झाली होती. रस्ता काँक्रिटचा झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळेल. रस्त्याचे काँक्रिटीकरण शक्‍य आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना एमआयडीसीला केल्या आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. इन्फोसिस सर्कल ते माण दरम्यानचा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु आयटी कंपनीतील कर्मचारी शिवाजी चौकातून फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या रस्त्याचा वापर कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. 

शिवाजी चौक आणि भूमकर चौकामध्ये सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. मर्सिडीज बेंझ शोरूम ते चांदे नांदेकडे जाणारा रस्ता झाल्यानंतर हा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागेल. सध्या या रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले आहे. उर्वरित काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 
- चरणजितसिंग भोगल, सीओओ, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन 

Web Title: Hinjewadi traffic collapse