हिंजवडीमध्ये कोंडीतून मुक्तीसाठी आता सहापदरी मार्ग

सुधीर साबळे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्या विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल दरम्यानचा रस्ता चार लेनचा आहे. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेत कंपन्या सुटल्यानंतर या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. वाहनचालकांना विप्रो सर्कलपासून इन्फोसिस सर्कलपर्यंत जाण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. विप्रो सर्कलच्या चौकाच्या परिसरात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यालगत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग होऊ लागल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडीमध्ये सातत्याने भर पडताना दिसते.

हिंजवडीत दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत सातत्याने भर पडत असून, दर दिवसाला हा आकडा एक लाख १३ हजार वाहनांपर्यंत जाऊन पोचला आहे. आयटी पार्कसाठी तयार करण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनचालकांकडून याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

सहापदरीकरणानंतर सुटेल प्रश्‍न
विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कल दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आयटी पार्कमधील जागा एमआयडीसीच्या ताब्यात आहे, त्यामुळे रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी नव्या जागेचे भूसंपादन करावे लागणार नाही. ‘एमआयडीसी’ने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे केलेले नियोजन लवकर पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. रुंदीकरणाचे काम वेगात पूर्ण झाले, तर आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी सांगितले.

आयटी पार्कमध्ये प्रस्तावित असणारे पर्यायी रस्ते सहा पदरी करण्याचे नियोजन आहे. आयटी पार्क परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 
- नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क  

रस्त्याचे अंतर दीड किलोमीटर 
सध्याचा रस्ता  चार लेन (साडेसात मीटर) 
प्रस्तावित रस्ता सहा लेन (सव्वाअकरा मीटर) 
रुंदीकरणासाठीचा खर्च १० कोटी रुपये  

Web Title: Hinjewadi Traffic Solution Road Increase