न्यायालयात लवकरच हिरकणी कक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पुणे - शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची (स्तनपान कक्ष) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन व न्यायालय प्रशासनाला सूचना केल्या  आहेत. 

पुणे - शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची (स्तनपान कक्ष) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन व न्यायालय प्रशासनाला सूचना केल्या  आहेत. 

पुणे बार असोसिएशनने या प्रश्‍नाचा पाठपुरावा करून जिल्हा न्यायाधीशांना व न्यायालय प्रशासनाला न्यायालयातील तीन सोयीस्कर जागांबाबत माहिती दिली आहे. या जागांपैकी एक जागा निश्‍चित करून पुढील काही महिन्यांत येथे स्तनपान कक्ष बांधण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती बार असोसिएशनने ‘सकाळ’ला दिली. हा स्तनपान कक्ष बांधण्यासाठी बार असोसिएशनकडून खर्चाच्या रकमेसाठीही योगदान दिले जाणार असल्याचे असोसिएशने सांगितले. 

न्यायालयात येणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून, अनेक महिला बालकांना घेऊन दररोज न्यायालयात येतात. लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी कोणतीही सुविधा न्यायालयीन आवारात उपलब्ध नसल्याने या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. यानंतर पुणे बार असोसिएशनने या सुविधेसाठी जिल्हा प्रमुख न्यायाधीशांना पत्र दिले होते. 

स्तनपान कक्षाच्या प्रश्‍नाबाबत आम्ही तज्ज्ञांशी बोलणी केली असून, यासाठी किती जागा आवश्‍यक असते, कोणत्या प्रकारच्या इतर सुविधा तिथे असल्या पाहिजेत, याची माहिती घेतली. यानंतर न्यायालय आवारातील तीन जागांचा पर्याय जिल्हा न्यायाधीशांना सुचवला. न्यायाधीशांच्या सूचनेनुसार आम्ही कक्षासाठी यातली एक जागा आठवड्याभरात निश्‍चित करणार आहोत. कक्ष बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबतही असोसिएशनच्या सदस्यांकडून वर्गणी जमा करण्याचा  मानस आहे. 
ॲड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Web Title: Hirakani Room in court soon