पाचशे वर्षांपूर्वी बारामतीत झालेले घनघोर युद्ध, इतिहासाची सोनेरी पाने आली उजेडात...  

baramati
baramati

सोमेश्वरनगर (पुणे) : महाराष्ट्रातील सगर (शेगर) समाजाचा क्षात्रतेजाने उजळून निघालेला इतिहास आता आढळून आला आहे.  इ. स. १४९८ मध्ये बारामती तालुक्यातील तरडोली येथे सोळा गावांवरचे आक्रमण मोडून काढताना वायूवेगाने लढलेल्या चौदा सगर समजाचा गौरव करणारी चौपाई आढळली आहे.  तसेच, त्याही आधीच्या काळात गुजराथमधील पाटण, कच्छ आदी ठिकाणी कित्येक सगर योद्धे वीरगतीस प्राप्त झाल्याची माहिती देणारी चौपाईदेखील आढळली आहे. 

महाराष्ट्रातील विदर्भ, सातारा, कोल्हापूर, कोकण, पुणे या जिल्ह्यांमध्ये शेगर (मराठी सगर) समाज मोठ्या संख्येने आढळतो. नीरा- भीमा नदीकाठी वसलेला हा समाज शेतकरी आहे. या समाजातील तरुणांनी क्षत्रीय सगर रजपूत सेवा संघ या संघटनेमार्फत आपल्या इतिहासाचा धांडोळा घेण्यास मागील काही वर्षापासून सुरवात केली होती. हा शोध घेताना समशेरबहाद्दर संताजी आटोळे, सरलष्कर जनकोजी कोकणे, सेट्याजी खोमणे या शिवकालीन अपरिचित योद्ध्यांचा इतिहास आढळला. मात्र आता त्याच्याही आधीचा इतिहास त्यांना सापडला आहे. गुजराथमधील अर्कालॅाजिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये जुन्या काळात लिहल्या गेलेल्या चौपाई आढळल्या आहेत.

कऱ्हा नदीकाठी असलेल्या सोळा गावांवर अहमदनगर सल्तनतीच्या हाजी मरवान व कासिम याह्या या योद्धांनी सन १४९८ मध्ये आक्रमण केले होते. त्या युद्धाचे वर्णन करणारी चौपाई ब्राम्हण कवी रायजी सयाजी पिंगळे यांनी लिहली होती. संभाजयी ख्याजी राऊत याने ती कागदावर लिहली. त्यातील नऊ उतारे सापडले आहेत. त्यामध्ये पठाण, कासिम यांच्याशी आटोळे, गावडे, खोमणे, सोरटे, वायाळ, गाढवे, सांगळे, शिंगाडे, ताम्हाणे, धुमाळ, धायतोंडे, पोमणे, राऊत, सगर असे चौदा योद्धे झुंजले होते, अशी स्पष्ट नोंद मिळाली आहे. पिंगळे, राऊत यांचेही सहाय्य झाले. चौदा सगरक्षात्र वायुवेगाने लढले असेही नमूद आहे. सांगवी, भिलारवाडी या गावांतील ते योद्धे होते, असाही उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे तेव्हाचा सुपे परगणा आणि आजचा बारामती तालुका याला पराक्रमाचा प्राचीन इतिहास असल्याचे प्रथमच पुढे येऊ शकतो.

याशिवाय एक हजार वर्षापूर्वी पाटण येथे लढलेल्या युद्धाचेही संस्कृत भाषेत वर्णन असणारी चौपाई सापडली आहे. यामध्ये सगर कुळाचा इश्वाकू वंशापासून सगर राजापर्यंतचा इतिहास लिहला आहे. त्याला जोडून कच्छ, पाटण येथे झालेल्या युद्धाचा संदर्भ दिला आहे. महायुद्धात सोळा सगर लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाल्याचाही उल्लेख आहे. भीलवाडचे ददाजी, गंगापूरचे रेण, हालाजीचे सगर मराठा, रेवाकाठचे गावडे, रोहिशाळाचे कर्णदेव, धुळ्याचे खोमणे, अमरावतीचे अजाण, जळगावचे शिंगाणे, कोल्हापूरचे आटोळे, साताऱ्याचे ताम्हाणे, इडरे, सोरटे अशा महाराष्ट्रातील मराठी सगर क्षत्रियांचा उल्लेख चौपाईत आहे. ही चौपाई राजकवी इश्वरा बोक्षा याने लिहलेली आहे. या चौपाईमुळे आज शेती करणारा आणि काही ठिकाणी मेंढ्या पाळणारा समाज लढवय्या होता हे समोर येणार आहे. 

याबाबत संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले की, आपली ओळख शोधत आम्ही पुणे, गुजराथ येथील पुराभिलेख खात्यासह ब्रिटीश लायब्ररीचाही धांडोळा घेतला आहे. परकीय आक्रमण अंगावर झेलून प्रतिरोध करणारा हा समाज होता, असा अपरिचित इतिहास पुढे येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com