शिल्प अन् लेण्यांमधून उलगडला नृत्यकलेचा इतिहास

shilp
shilp

पुणे : संगीत, शिल्प आणि चित्र याला खूप जुना इतिहास आहे. या कला एकमेकांवर अवलंबून आहेत. आज जागतिक नृत्य दिनानिमित्त या शिल्पांकडे पाहिलं तर, ही शिल्प यामध्ये महत्त्वाचं योगदान देताना दिसतात. लेण्या, पुरातन मंदिरं यांच्या भोवती अनेक शिल्प रेखाटलेली दिसतात. या शिल्पांमधून फक्त प्रसंग दिसत नाहीत तर, त्यामधून उलगडतो तो नृत्याचा इतिहास आणि आजवर या शिल्पांमुळे टिकून राहिलेल्या भावमुद्रा. यामध्ये स्थिर शिल्प व कथन शिल्प असे दोन महत्त्वाचे प्रकार पाहायला मिळतात. स्थिर शिल्पांमध्ये आपल्याला विविध मुद्रा आणि स्थिती पाहायला मिळतात तर, कथन शिल्पामध्ये पुराणातील एखादी कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. कथन शिल्पातील कथा अनेक प्रकारच्या शास्त्रीय नृत्यामध्ये सुद्धा सहज वापरलेल्या आढळुन येतात. 

शिल्पांनी सजलेली अनेक मंदीरे, लेण्या या भारतात उत्तर व दक्षिण भागात मोठ्या संख्येने पहायला मिळतात. दक्षिणेत असे म्हटले जाते की शंकराने 108 प्रकारचे नृत्य केले आणि चिदंबरमच्या नटराज मंदिराच्या गोपुरांवर शिवनृत्याचे एकशे आठ प्रकार प्रतिमारुपाने व भरत नाट्यशास्त्राच्या आधारे रेखाटले. मंदिराच्या गाभाऱ्याभोवती असलेली नृत्य करणारी शिल्प बरचं काही सांगून जातात, तुमचा अहंकार, राग, लोभ, बाहेर ठेवून आत प्रवेश करा,असा काहीसा संदेश देणारी ही शिल्प असतात. या शिल्पांच्या मुद्रेचा विचार केला तर शिल्पांमधून बरचं काही शिकता येते. यामधून रेखाटलेले '108 करण' यामुळे आजही नृत्यशैली  तेवढ्याच ताकदीने आणि जशीच्या तशी टिकून आहे हे लक्षात येते.

मंदीरांच्या रचनेवरून ते कोणत्या काळात बांधले गेले असावे, याचा अंदाज बांधला जातो. त्यावरूनच कोणत्या शतकात कशा मुद्रा विकसीत केल्या होत्या, हे ही लक्षात येते. नृत्यातील अष्टनायिका आपण आजही जशाच्या तशा शिल्पांच्या आधारानेही  उभारू शकतो तर शिल्पातील सुरसुंदरी नृत्यात आकारू शकतो . या शिल्पांमुळे नृत्याचा मूळ गाभा जिवंत आहे असे म्हणायला हरकत नाही. वेरूळ लेण्यामध्ये बारकाईने जर शिल्प पाहिली तर तिथे शिल्पांमध्ये नृत्यातील मुद्रा, कथा, भाव, नवरस यांचा साक्षात्कार असल्याचे पाहायला मिळते. 

देवदेवतांचे शिल्प रेखाटताना त्यांना आठ दहा हात दाखवले जायचे. त्या प्रत्येक हाताच्या मुद्रा वेगळ्या असतात. परंतु, दोन वेगळे हात एकत्र केल्यास त्यातून एक नवीन मुद्रा तयार होते. हे या दहा हातामधून रेखाटल्याचे कौशल्यचं म्हणावे लागेल. या दहा हातामधून आपण अनेक रचना तयार करू शकतो. 

''शिल्पासाठी शिल्पकारांनी पुराणांचा आधार घेतला तर नृत्यानेही सादर करताना पुराणांचा आधार घेतला, हाच शिल्प आणि नृत्यामधला समान धागा आहे. नृत्य, शिल्प, चित्र यामध्ये एक जुळलेली नाळ आहे. आधी नृत्य की आधी शिल्प असे त्याला वेगळे काढता येणार नाही. जर या नृत्याची शिल्प सांभाळली तर ती पुढच्या अनेक पिढीपर्यंत जातील. नवीन मुद्रा नक्कीच निर्माण कराव्यात पण जुनंही जपलं पाहिजे. शेवटी कथक म्हणजे कथा सांगणारं नृत्य, त्यामुळे शिल्पातून आलेल्या विविध मुद्रांचे बारकावे पाहिले तर कथक नृत्य समृद्ध होऊ शकतं.''
- निलिमा हिरवे, कथक नर्तिका 

''प्राचीन काळात वादन, गायन, नृत्य देवांसाठी सादर केलं जायचं, त्यामुळे अशी शिल्प खासकरून मंदिरांच्या भोवती दिसतात. खजुराहोमध्ये अशी अनेक शिल्प आहेत. या कला मंदिरांच्या आश्रयाने वाढलेल्या आहेत. आता त्या जतन करणे गरजेचे आहे. काही शिल्पांमधल्या मुद्रा शास्त्रीय नृत्यात आलेल्या नाहीत पण त्या लोककलेमध्ये वापरल्या गेल्या आहेत, त्याही जतन करायला हव्यात. प्रादेशिक नृत्य विकसीत होण्याचे मुळ स्त्रोत नृत्य आहे, यामधून हजारो वर्षांचा नृत्याचा इतिहास तसेच त्याचे टप्पेही कळतात. भरताचं नाट्यशास्त्र ते 13-14व्या शतकापर्यंत ही शिल्प रेखाटली गेली आहेत.''
- मंजिरी भालेराव, सहयोगी प्राध्यापिका, संस्कृत आणि भारतीय विद्या विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com