महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने मारहाण 

संदीप घिसे 
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी : महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यास जबर मारहाण करण्यात आली. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे घडली. 

पिंपरी : महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यास जबर मारहाण करण्यात आली. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे घडली. 

सचिन उद्धव शिंदे (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत तीन अज्ञात व्यक्‍तींच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये शिंदे यांनी फ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत स्थापत्य विषयक केलेल्या कामाची माहिती मागविली होती. या कामांमध्ये गैरव्यवहार असल्याचे दिसून आले, यामुळे 14 नोव्हेंबर 2016 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी येथे तक्रार अर्ज दिला. या अर्जावर सुनावणी होऊन निगडी पोलिसांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले. 

11 मे 2018 रोजी शिंदे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यांना चिंचवडला येण्यास रात्रीचे बारा वाजून गेले होते. चिंचवड रेल्वे स्टेशन येथून आपल्या दुचाकीवरून मित्र परेश मैड यांच्यासह चालले होते. ते मोहनगर येथील एक्‍साईज बॅटरी कंपनीजवळ आले असता दुचाकीवरून तीनजण आले. तूच सचिन शिंदे का, अशी विचारणा केली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देतो काय, असे म्हणत शिवीगाळ केली. केस माघारी घे अन्यथा वाईट परिणाम होतील, असे म्हणत लाकडी दांडक्‍याने पायावर मारून उजव्या पायाच्या अंगठ्या लगतची चार बोटे फॅक्‍चर केली. शिंदे यांचा मित्र मैड हा मध्यस्थी करण्यास पुढे आला असता आरोपींनी त्यास तुझा काही संबंध नाही, तू मध्ये पडू नकोस, असे सांगत दमदाटी केली. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: hitting a man for filed complained against officers of municipal corporation