बुरा न मानो, होली है...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

पर्यावरणपूरक कोरड्या रंगांची उधळण करत धुळवड शहरात उत्साहात साजरी झाली. मात्र, चौकाचौकांत होणारी गर्दी व चिनी रंगाच्या भीतीने चिमुकल्यांसह तरुणांनीही रंग खेळण्याचे टाळले. धुळवडीच्या उत्साहावर कोरोनाचे सावट यंदाच्या वर्षी मंगळवारी (ता. १०) काही प्रमाणात दिसले.

पिंपरी - पर्यावरणपूरक कोरड्या रंगांची उधळण करत धुळवड शहरात उत्साहात साजरी झाली. मात्र, चौकाचौकांत होणारी गर्दी व चिनी रंगाच्या भीतीने चिमुकल्यांसह तरुणांनीही रंग खेळण्याचे टाळले. धुळवडीच्या उत्साहावर कोरोनाचे सावट यंदाच्या वर्षी मंगळवारी (ता. १०) काही प्रमाणात दिसले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘रंग बरसे भिगी चुनरवाली,’ ‘होळीचा सण लय भारी,’ ‘बुरा न मानो होली हैं’ या गाण्यांवर सोसायटी व मंडळाच्या तरुणाईने ठेका धरला. पेट्रोलपंपही काही ठिकाणी बंद होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलिस बंदोबस्त होता. काही ठिकाणी मटनासाठी रांगा दिसल्या. मटण ६५० व चिकन १४० रुपये किलो होते. 

होय, मटणाची विक्री झाली तब्बल दीड हजार किलो...

सिरवी समाजाचा ‘धुंड’ उत्साहात 
कासारवाडी येथील आई माताजी मंदिरात सिरवी समाज बांधवांनी ‘धुंड’ उत्सव साजरा केला. पुरुषांनी ‘गेर’ तर महिलांनी ‘घुमर’ नृत्य सादर केले. हातामध्ये रंगीबेरंगी छत्री घेऊन गोलाकार नृत्य करण्यात सिरवी बांधव दंग झाले होते. काही मर्दानी खेळीही या वेळी सादर केले. नवजात बालकांचे या वेळी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर फुलांची उधळण झाली. महाप्रसादाचा लाभ घेतला. 

तळेगावात रंगोत्सव
तळेगाव स्टेशन -
 धुळवडीला तळेगावात रंगांची मुक्त उधळण अनुभवायला मिळाली. कोरोनाच्या सावटाखाली कोरडी धुळवड खेळत रंगोत्सव साजरा केला. आबालवृद्धांपर्यंत सगळेजण रंगात न्हाऊन निघाले होते. सोसायट्यांमधील महिलांनी एकमेंकाना ओले, सुके रंग लावत त्यांनी आनंद लुटला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी जिजामाता चौकासह वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त होता. 

धुळवड नाहीच
कामशेत - शहरासह ग्रामीण भागात धूलिवंदनावर कोरोनाचे सावट पाहायला मिळाले. रंग विक्री व खरेदीवर त्याचा परिणाम दिसून आला. परिसरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी रंगांची उधळण करणे टाळून खबरदारी घेतली. तर मोजक्‍या काही हौशी मंडळींनी कोरडा रंग लावून धुळवड साजरी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holi Celebration in pimpri chinchwad