#PuneFlood पुणे - शाळांना आज सुटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

हवामान विभागाने उद्या (सोमवार) आणि मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, पालिकेच्या शाळाही बंद राहतील.

पुणे - जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची (एनडीआरएफ) दोन पथके पाचारण केली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (सोमवार) आणि मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, पालिकेच्या शाळाही बंद राहतील.

शहर आणि जिल्ह्यांत सलग नऊ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस होत असल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील धरणे आणि मुळशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. या धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून, तो वाढविण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांत नदीकाठी असलेल्या सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने मुंबईतून दोन ‘एनएडीआरएफ’ची   पथके पाचारण केली आहेत. मुळशी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली. 

परीक्षाही पुढे ढकलल्या 
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, परिस्थिती विचारात घेऊन सुटीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. उद्यापासून परीक्षा सुरू होत असलेल्या शाळांना परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात येतील, असेही जयश्री कटारे यांनी सांगितले.

प्रशासनाचे आवाहन
  आवश्‍यकता असेल, तरच घराबाहेर पडा.
  पुलावर अथवा नदीकाठच्या भागावर थांबू नका.
  धबधब्याखाली अथवा टेकडीवर जाण्याचे टाळा.
  शक्‍यतो प्रवास करणे टाळा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holidays to schools today