एका दिवसात मिळणार घरपोच गॅस सिलेंडर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नोंदणीनंतर एका दिवसात घरपोच सिलिंडर मिळेल, नागरिकांनी बाहेर जाण्याची गरज नाही,' असे इंडियन ऑईलचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी स्पष्ट केले. 

पुणे -  लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी घाबरून घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता ही असुविधा दूर करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी वितरणातील त्रुटी सुधारल्या आहेत. "नोंदणीनंतर एका दिवसात घरपोच सिलिंडर मिळेल, नागरिकांनी बाहेर जाण्याची गरज नाही,' असे इंडियन ऑईलचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी स्पष्ट केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस वितरण व्यवस्थेबद्दल अखौरी यांनी "सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यात इतर वेळी रोज सुमारे 58 लाख सिलिंडरसाठी नोंदणी होते, पण लॉकडाउननंतर तो आकडा 60 लाखांपर्यंत गेला होता. सुरक्षेच्या कारणास्तव डिलिव्हरी बॉय कामावर येत नव्हते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. ग्राहकांनी गॅस नोंदणीसाठी गर्दी करू नये म्हणून आता एक गॅस घेतल्यानंतर त्यासाठी पुढची नोंदणी 15 दिवसांनी करता येणार आहे. एक गॅस सिलिंडर सरासरी 21 दिवस पुरतो, त्यामुळे नोंदणीसाठी 15 दिवसांची मर्यादा टाकली आहे. या नियमामुळे नोंदणी कमी होऊन मागणीवर नियंत्रण आणले आहे. राज्यात भरपूर एलपीजी गॅसचा साठा आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होणार नसल्याने नागरिकांनी घाबरू नये. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

'लॉकडाउन'मध्ये एलपीजी गॅस वितरक, डिलिव्हरी बॉय यासह रिफायनरी, एलपीजी प्लांट, स्टोअरेज येथे मोठी यंत्रणा काम करत आहे. 'कोरोना'मुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे, यासाठी त्यांना ग्लोज, सॅनिटायजर, मास्क अशा सर्व सुविधा पेट्रोलियम कंपन्यांनी पुरविल्या आहेत. त्यामुळे डिलिव्हरी बॉय कामावर आलेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी 1 लाख रुपये मदत व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांचा विमा त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. 

उज्ज्वला योजनेतील सात लाख लाभधारकांचे पैसे जमा 
लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतील गॅसधारकांना एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे सिलिंडर मोफत मिळणार आहे. महाराष्ट्रात या योजनेचे इण्डेन, भारत गॅस, एचपी गॅस यांचे एकूण 44 लाख लाभधारक आहेत. त्यापैकी 11 लाख हे इण्डेनचे असून, त्यापैकी 7 लाख जणांच्या खात्यात एका महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. येत्या तीन- चार दिवसात इतरांचेही पैसे जमा होतील. पुढील सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर पुढच्या महिन्याचे पैसे जमा होतील, असे अखौरी यांनी सांगितले. 

पेट्रोलियम कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक वितरकाकडे अधिकाऱ्याचे नाव व क्रमांक आहे. त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. 
- अमिताभ अखौरी, कार्यकारी संचालक, इंडियन ऑइल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home delivery of gas cylinders will one day in lockdown