ज्येष्ठांसाठी ‘होम टू डॉक्‍टर’चा दिलासा

ज्येष्ठांसाठी ‘होम टू डॉक्‍टर’चा दिलासा

पुणे - मुले घर सोडून गेल्याने किंवा परदेशी स्थायिक झाल्याने आलेल्या एकटेपणाच्या जगण्यात आजारपण हे आलंच...उतारवयात मग दवाखान्यापर्यंत जाण्यासही अडचणी येतात अन्‌ आजार वाढतो...अशाच थकलेल्या वयातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ‘होम टू डॉक्‍टर’ या उपक्रमाची सुरवात झाली आहे. कोथरूड ज्येष्ठ नागरिक महासंघाने एकाकी आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठांपर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा पोचविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, दहा तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम दर महिन्याला ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करत आहे. कुठेतरी या उपक्रमामुळे ज्येष्ठांना एक आधारवड मिळाला असून, घरबसल्या वैद्यकीय उपचार मिळत असल्याने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यातून एक वेगळाच आधार मिळाला आहे. 

विविध कारणांमुळे एकटे राहणाऱ्या कोथरूडमधील ८३ ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी या ज्येष्ठांना एक खासगी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला असून, तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करते. 

ज्येष्ठांनी फोन केल्यावर त्यांच्या घरी जाऊन डॉक्‍टर तपासणी करतात. दहा ते पंधरा मिनिटांच्या या तपासणीनंतर त्यांना मोफत औषधेही दिली जात आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी आणि अल्झायमरसारख्या विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर ही डॉक्‍टरांची टीम मोफत उपचार करत आहे.

होम टू डॉक्‍टर या उपक्रमाचा मला नक्कीच फायदा झाला आहे. डॉक्‍टरांना फोन केला की, ते घरी येऊन तपासणी करतात. त्यामुळे दवाखान्यापर्यंत जाण्यासाठीची दगदग थांबली असून, त्याचा माझ्यासारख्या अनेकांना फायदा होत आहे.
- वासुदेव देवकाते, ज्येष्ठ नागरिक

आज पुण्यात सुमारे तीन हजार ज्येष्ठ नागरिक एकटेपणाचे आयुष्य जगत आहेत. या ज्येष्ठांना होम टू डॉक्‍टर या उपक्रमामुळे एक आधार मिळाला आहे. एका वर्षापूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला, त्याला ज्येष्ठांनीही चांगला प्रतिसाद दिला. साधारणतः ६५ वयापुढील ज्येष्ठांपर्यंत आम्ही मोफत वैद्यकीय उपचार पुरवितो. उपक्रमामुळे ज्येष्ठांची दवाखान्यापर्यंत पायपीट थांबली आहे. 
- श्रीराम बेडकीहाळ,  अध्यक्ष, कोथरूड ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि आनंदी ज्येष्ठ नागरिक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com