घोडे, गाढवांच्या आरोग्यासाठी जागृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जेजुरी - गाढव, घोडे या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी तशी घेतली जात नाही. गाढव तर तसा फारच दुर्लक्षित. त्यांचा कामासाठी उपयोग करताना त्यांचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यांच्या आरोग्यासाठी गेल्या अठरा वर्षांपासून साताऱ्याची श्रमिक विकास संस्था व इंग्लंडची ब्रुक हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स इंडिया ही संस्था कार्य करीत आहे.

जेजुरी - गाढव, घोडे या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी तशी घेतली जात नाही. गाढव तर तसा फारच दुर्लक्षित. त्यांचा कामासाठी उपयोग करताना त्यांचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यांच्या आरोग्यासाठी गेल्या अठरा वर्षांपासून साताऱ्याची श्रमिक विकास संस्था व इंग्लंडची ब्रुक हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स इंडिया ही संस्था कार्य करीत आहे.

यात्रेच्या अथवा बाजाराच्या ठिकाणी जाऊन या संस्थेचे कार्य सुरू आहे. 
जेजुरीतील गाढवांच्या बाजारात दोन दिवसांपासून या संस्थेचे काम चालू आहे. घोडे व गाढव पाळणाऱ्या मालकांमध्ये जनावरांच्या आरोग्याविषयी जागृती करणे, त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल हे पाहणे, त्यांच्याकडून कसे काम करून घ्यावे, त्यांचे आरोग्य कसे राखावे आदी मार्गदर्शनाबरोबर घोडे व गाढवांची पोटदुखी, अपंगत्व, डोळ्याचे विकार, जखमा, खुराची निगा आदीबाबत आवश्‍यक त्या प्रमाणे उपचार केले जात आहेत. प्रात्यक्षिकही करून दाखविले जात आहेत. आवश्‍यक त्यांना मोफत औषधोपचार दिले जात आहेत. जेजुरीच्या बाजारात दोन दिवसांपासून सात जणांचे पथक कार्य करीत आहे. ब्रुक हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स इंडिया, श्रमिक जनता विकास संस्था (सातारा) व जेजुरीतील पशू वैद्यकीय केंद्र यांच्या वतीने समन्वय साधत लिंबाच्या झाडाखाली उपचार केंद्र सुरू केले आहे. त्यामध्ये डॉ. विजय मल, शांता कुमार, अशोक भांगे, शिवाजी ओंबासे, भीष्मा चौहान, पशुधन पर्यवेक्षक एस. बी. गायकवाड आदी येथे दिवसभर काम करताना दिसत होते. दिवसभरात सुमारे चाळीस ते पन्नास जनावरांवर विविध प्रकारचे उपचार केल्याचे या वेळी सांगण्यात आले.

चौदा देशांमध्ये सन १९३४ पासून काम
इंग्लंडमधून ब्रुक हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स ही संस्था भारतासाठी काम करीत आहे. सन १९३४ पासून चौदा देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. भारतामध्ये ही संस्था २००० पासून काम करीत आहेत. महाराष्ट्रात सातारा, लातूर, नांदेड, बीड, पुणे, नगर, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी जाऊन जागृती व उपचाराचे काम केले जात आहे. विशेषतः यात्रेच्या ठिकाणी जाऊन या संस्थेमार्फत घोडा व गाढवांच्या आरोग्याच्या काळजी घेतली जाते. पायाचे अनावश्‍यक खूर कसे काढावे व त्याची निगा कशी राखावी, याचे प्रात्यक्षिकही येथे दाखविले जाते.

Web Title: Horse Donkey health Awakening