जिल्हास्तरीय भरारी पथके करणार वसतीगृहांची तपासणी

जिल्हास्तरीय भरारी पथके करणार वसतीगृहांची तपासणी
Published on

वसतिगृहांची होणार आता भरारी पथकाकडून तपासणी

सुविधा न देणाऱ्या संस्थांवर दाखल होणार गुन्हे; प्रत्येक विद्यार्थ्याला बेड देण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ ः गडचिरोली येथील वसतिगृहात सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत राज्यातील वसतिगृहांची व्यापक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व वसतीगृहांची भरारी पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून न देणाऱ्या संस्थांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांनी दिले.

समितीच्या जिल्हा दौऱ्यात वसतीगृहांमधील विविध त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना कांदे यांनी दिल्या. प्रत्येक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या पाहणीनंतर जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची समिती अध्यक्ष सुहास कांदे यांच्यासमोर साक्ष झाली. यावेळी समितीने पाहणीदरम्यान नोंदविलेल्या त्रुटी, त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि पुढील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पथकांकडून वसतिगृहांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निवास व्यवस्था, बेड, स्वच्छता, सुरक्षितता तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याची तपासणी केली जाणार आहे.

त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई
वसतिगृह प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे तपासणीत आढळल्यास संबंधित संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. केवळ कागदोपत्री सुविधा दाखविण्याऐवजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थांची असल्याचे समितीने स्पष्ट केले. वसतिगृहांमधील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश समितीने दिले.

कोट...

गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर शासनाने वसतीगृह तपासणीसाठी भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाच पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. वसतिगृहांच्या तपासण्या अचानक करण्यात येणार आहेत. ज्या वसतिगृहात भौतिक सुविधा असणार नाहीत, त्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com