वसतिगृहासाठी विद्यार्थी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - पुढील शैक्षणिक वर्षात भाडेतत्त्वावर असणाऱ्या आदिवासी वसतिगृहांच्या इमारती सोडण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. याबाबत इमारतींच्या मालकांना कळविण्याबाबतचे पत्र गृहपालांना पाठविले आहे. या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. 

याबाबत दलित, आदिवासी अधिकार आंदोलनाचे संस्थापक सदस्य डॉ. संजय दाभाडे म्हणाले, ‘‘राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या वसतिगृह प्रकल्पांच्या गृहपालांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे. यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजनेत समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त करावे, भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये असणारी वसतिगृहे बंद करण्याबाबत इमारतीच्या मालकांना सांगितले जावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच, दोनदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्ती दिली जाणार नाही, असे सांगितले आहे. या आदेशानुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर ‘तुमचे सर्व प्रकारचे साहित्य घेऊन जा’, असे सांगण्यात येत आहे. ही वसतिगृहे बंद पडल्यास राज्यातील चार हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात येईल.’’ 

या आदेशाला विरोध करण्यासाठी आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या दीड हजार विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
 पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेसाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करू नये.
 भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये कार्यरत असणारी वसतिगृहे बंद करू नयेत. याउलट, जास्तीची क्षमता असणाऱ्या शासकीय वसतिगृहांची निर्मिती करावी.
 केंद्र सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती नियमितपणे द्यावी. 

Web Title: Hostel for the students on the road