पुणेकरांना खूषखबर! हॉटेल, बार आता रात्री साडेअकरापर्यंत खुले राहणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

"मिशन बिगिन अनेग'तंर्गत लॉकडाउन शिथिल करताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी या बाबतचे आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी 8 ते रात्री 11. 30 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांचा तेथे समावेश असावा.

पुणे : दसऱ्याचे औचित्य साधून महापालिकेने पुणेकरांना खूषखबर दिली आहेत. शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार आता रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. तसेच व्यायामशाळाही रविवारपासून (ता. 25) खुल्या होणार आहेत.

'मिशन बिगिन अनेग'तंर्गत लॉकडाउन शिथिल करताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी या बाबतचे आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी 8 ते रात्री 11. 30 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांचा तेथे समावेश असावा. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना किमान 5 हजार रुपये दंड करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही त्यांना अंमलबजावणी करणे भाग असेल. त्यासाठी महापालिकेची विविध पथकेही तपासणी करणार आहेत.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

शहरातील व्यायामशाळांबाबतही महापालिकेने आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार त्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. व्यायामशाळांना दसऱ्यापासून परवानगी देण्यात येईल, असे राज्य सरकारने या पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार महापालिकेने आता आदेश प्रसिद्ध केला आहे. जिम सुरू कराव्यात यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील विविध संघटना आग्रही होत्या. त्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार निवेदनेही देण्यात आली होती. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली होती. आरोग्य खात्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्यायामशाळा खुल्या ठेवाव्यात, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

बार सुरू करण्यासाठीही राज्यातील हॉटेल लॉबी कमालीची आग्रही होती. व्यवसाय - धंदे झाल्यावर ग्राहक बारमध्ये येतात. त्यामुळे त्यांची वेळ पूर्ववत ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने हॉटेल लॉबीची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, बार आता रात्री साडेअकरापर्यंत खुले राहतील. शहरातील मंदिरे, उद्याने सध्या बंद आहेत. व्यायामासाठी उद्याने खुली ठेवावीत, अशीही व्यायामप्रेमींची मागणी आहे. मात्र, महापालिका प्रशासनाची त्या बाबत नकारघंटा कायम आहे. मंदिराबाबतही राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेईल. त्यानंतर महापालिका निर्णय घेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

बारमध्ये बसताना ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर असावे. तसेच प्रत्येक टेबल काही वेळानंतर सॅनिटाईज करावे, ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क असावेत, प्रत्येक ग्राहकाचे तापमान नोंदवावे. ते मर्यादेत असेल तरच त्यांना प्रवेश द्यावा, असेही महापालिकेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels and bars in Pune will now be open till 11.30 pm