निवडणुक बिहारची, पण त्याचा फटका पुण्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंटला 

सागर आव्हाड
Tuesday, 20 October 2020

शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट अजूनही सुरु झालेली नाहीत. मात्र हॉटेल सुरू केले असले तरी कामगार, कुक, वेटर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

पुणे : सरकारने अनलॉक ५ मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तसे असले तरी बिहार निवडणुकीचा चांगलाच फटका हॉटेल धारकांना बसत आहे. हॉटेल्स, रेस्टाॅरंट सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी कामगार परत न आल्याने शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट अजूनही सुरु झालेली नाहीत. मात्र हॉटेल सुरू केले असले तरी कामगार, कुक, वेटर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध कायम ठेवले होते. हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येण्यासाठी अनेक निर्बंध उठवण्यात आले. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकत अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली.

सरकारने परवानगी दिली असली तरी बाहेरील राज्याचे कामगार परत न आल्याने हॉटेल्स चालकांना आपली हॉटेल्स सुरु करता येत नाहीयेत. पुणे शहरात एकूण 8 हजारांहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट असून, जिल्ह्यात 2 लाख कर्मचारी काम करतात. त्यातील दिड लाखाहून अधिक कर्मचारी बिहार, राजस्थान, बंगाल, मध्यप्रदेश येथील कामगार आहेत.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु  झाल्यानंतर आम्ही कामगारांना संपर्क केला पण बंगालमध्ये नवरात्र उत्सव आणि बिहारची निवडणूक असल्याने या भागातील कामगार आता येऊ शकत नाहीत. त्यामुळे पुढच्या महिन्याभरापर्यंत हॉटेल्समध्ये आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करून घ्यावं लागणार आहे.

राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरु करण्यास जरी परवानगी दिली असली, तरी आज शहरात कामगार नसल्याने अनेक हॉटेल्स सुरु करू शकत नाहीयेत असे मालक सांगत आहेत. तसेच पुणे शहरात अजूनही बाहेरील विद्यार्थी, काम करणारे कर्मचारी पुण्यात परत न आल्याने ५० टक्के क्षमतेने जरी सुरु केलं असलं तरी अजून ग्राहक येत नाहीयेत. तसेच पुढील महिन्यात दिवाळी असल्याने कामगार येण्याची शक्यता कमीच आहे.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

हॉटेल असोसिएशनचे पूर्व भाग अध्यक्ष बाळासाहेब आमराळे म्हणाले की, ''कामगारांना परत महाराष्ट्रात येण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीयेत. तसेच बिहारच्या निवडणुकीचा फटकाही हॉटेल्स चालकांना बसत आहे. एकीकडे लॉकडाउनमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असल्याने बसलेला मोठा आर्थिक फटका, त्यात आता सुरु झाल्यानंतर कामगार नसल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट चालक मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यात पुणे शहरात जवळपास 90 टक्के हॉटेल्स हे रेंटने चालतात लॉकडाउनचा फटका आणि आता कामगारांचा फटका बसल्याने पुण्यातील काही हॉटेल्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत.'' त्यामुळे पुणेकरांना अजूनही चटपटीत खाण्यासाठी वाट पाहावी लागेल असे दिसते आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotels and restaurants in pune are in financial difficulties due to lack of workers