कॅन्टोन्मेंटमध्ये घर व इमारत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कॅन्टोन्मेंट परिसरातील एक घराचा दर्शनी भाग व एका तीन मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. यात घराशेजारी बांधलेल्या दोन वासरांचा मृत्यू झाला.

कॅन्टोन्मेंट - कॅन्टोन्मेंट परिसरातील एक घराचा दर्शनी भाग व एका तीन मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. यात घराशेजारी बांधलेल्या दोन वासरांचा मृत्यू झाला.  

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी व लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, राडारोडा हटविण्यास सुरुवात केली. 

जान महंमद रस्त्यावरील कुंभार बावडीसमोरचे एक मजली घर गुरुवारी सायंकाळी कोसळले. मात्र, घराजवळ बांधलेल्या दोन वासरांचा मृत्यू झाला असून, एक वासरू जखमी झाले आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून हे घर बंदिस्त अवस्थेत होते. त्यामुळे घराचा वापर होत नव्हता. 

दरम्यान, याच वेळी महात्मा गांधी रस्त्यावरील राममंदिरासमोर एक तीन मजली इमारत अचानक कोसळली.  

या वेळी झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला. या इमारतीच्या तळमजल्यावर एक दुकान आहे, तर वरचे दोन्ही मजले अनेक वर्षांपासून बंदिस्त होते. पावसामुळे दुसऱ्या मजल्याचा काही भाग कुजला होता. सायंकाळी अचानक दुसऱ्या मजल्यावरचे फ्लोअरिंग पहिल्या मजल्यावर कोसळले. या वेळी तळमजल्यावरील सिल्क स्टोर दुकानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने रस्त्यावर धाव घेतली. आसपासच्या दुकानदारांनी अग्निशामक दल आणि पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता मोकळा करण्यास मदत केली. तसेच नगरसेवक दिलीप गिरमकर व नगरसेवक अतुल गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन, मदतकार्यासाठी सूचना केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House and Building Collapse in Cantonment Area Accident