फ्लॅट असो छोटा-मोठा; मेन्टेनन्स असणार समान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

सोसायटीला वसुलीचा अधिकार 
सभासदाने देखभाल आणि सेवाशुल्क भरण्यास कसूर केल्यास सोसायटी अशा सभासदाविरुद्ध अधिनियमातील कलम ९१ आणि १०१ नुसार वसुलीची कार्यवाही करू शकते. थकीत रकमेवर दरसाल २१ टक्‍के किंवा सोसायटीने निश्‍चित केलेल्या दराने सरळ व्याज देणे आवश्‍यक असेल, असे उपविधीत नमूद आहे.

पुणे - सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्ज) हे सदनिकेच्या आकारावर अवलंबून नसून, सर्व लहान-मोठ्या सदनिकांना समान मेंटेनन्स आकारणे बंधनकारक आहे, तशी तरतूद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीत आहे, असे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशनने स्पष्ट केले.

काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखभाल शुल्काच्या मुद्द्यावरून अंतर्गत वाद होतात. काही सोसायट्यांमध्ये सदनिकेच्या चौरस फुटांनुसार शुल्क आकारण्यात येते. मग, आपल्या सोसायटीमध्ये का नाही, असे काही सभासद विचारतात. 

काही सोसायट्यांमध्ये बेडरूमच्या संख्येनुसार शुल्क आकारण्याचा ठराव झाल्याचीही उदाहरणे आहेत; परंतु सर्व सदनिकाधारकांना सोसायटीमध्ये सारख्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यानुसार 
सर्वांना समान शुल्क भरणे बंधनकारक आहे. मेंटेनन्समध्ये सेवाशुल्क हे सर्वांना समान आहे. त्याव्यतिरिक्‍त केवळ इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठीचा निधी प्रत्येक सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार वर्षाला किमान ०.७५ टक्‍के असेल, तर सिंकिंग फंड हा दरवर्षी सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या ०.२५ टक्‍के आकारण्यात येतो, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. 

सिंकिंग फंड आणि देखभाल दुरुस्ती खर्चासह मेंटेनन्स आकारणीबाबत सोसायट्यांचे सभासद, पदाधिकारी आणि व्यवस्थापकांना फेडरेशनकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing Issues Society Maintenance Charge Dispute