गुण पडताळणीसाठी साडेचार हजार अर्ज

Marks
Marks

पुणे - बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी मिळालेले गुण पडताळणीत वाढतील, या अपेक्षेने तब्बल साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुण पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांच्या गुण पडताळणीसाठी सर्वाधिक अर्ज आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल यंदा कमी लागला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पुणे विभागीय मंडळाकडे गुण पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. यंदा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षी अडीच हजार विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी अर्ज केले होता. यंदा त्यात जवळपास दुप्पट वाढ होऊन ही संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 

पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांपैकी पुणे शहरातून गुण पडताळणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या अधिक आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत.

छायाप्रत मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा 
गुण पडताळणीबरोबरच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठीही अर्ज केला आहेत. उत्तरपत्रिकेवरील बारकोड, त्यानुसार डी-कोडिंग करून संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत लवकरात लवकर देण्याचे काम सुरू असल्याचे विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. गुण पडताळणीबरोबरच छायाप्रतीसाठी आलेल्या अर्जांची संख्याही जास्त असल्याने त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता आहे. 

जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स, नीटमध्ये पात्र ठरलेले असताना बारावीच्या गुणांमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्राधान्याने गुण पडताळणी करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अर्जासोबत प्रवेश प्रक्रियेतील पुरावे जोडण्याची सूचना करण्यात आली आहे. 
- बी. के. दहिफळे, विभागीय सचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com