मोठी बातमी: दौंड रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीनला लागली आग; स्टेशनवर उडाला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली.

दौंड (पुणे) : मध्य रेल्वेचे महत्वपूर्ण जंक्शन असलेल्या दौंड रेल्वे स्थानकावरील एका उपहारगृहात गुरुवारी (ता.२६) मोठी आग लागली होती. परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागली तेव्हा गोरखपूर एक्सप्रेस फलाटावर उभी होती.

...तर बांधकाम व्यावसायिक देशाधडीला लागतील; ग्राहकांनाही बसेल आर्थिक फटका​ 

रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. उपहारगृहाच्या स्वयंपाकगृहात आग लागली आणि क्षणार्धात त्याचा भडका झाला. आगीची झळ पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण पुरेसे नव्हते. आग लागली तेव्हा पुणे-गोरखपूर ही एक्सप्रेस फलाट क्रमांक दोन वर उभी होती.

डिलिव्हरी बॉयने साकारला 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक!​

आग वाढू लागल्याने एक्सप्रेस मधील प्रवासी आणि फलाटावरील लोक गोंधळले होते. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानकावर विविध ठिकाणी असलेले अग्निशामक उपकरणांचा वापर करून आणि पाण्याचा मारा करून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर स्थानकावरील भीती आणि गोंधळाचे वातावरण निवळले.

निष्काळजीपणामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीच्या निमित्ताने आगीचा सामना करण्यासाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सुसज्ज नसल्याचे स्पष्ट झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge fire broke out in a restaurant at Daund railway station