Video: डिलिव्हरी बॉयने साकारली 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक!

सुवर्णा नवले
Thursday, 26 November 2020

सर्व नागरिक या किल्ल्याला भेट देऊन तयार केलेल्या प्रतिकृती बद्दल आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. प्रत्यक्ष भेट न घेताही किल्ले रायगडाचे फोटो, व्हिडिओ, पुस्तके जमा करून किल्ल्याची महिती घेऊन मांडणी करण्यात आली आहे.

पिंपरी : लॉकडाउनमध्ये सर्वांचाच रोजगार हिरावला. हाताला काम नसल्याने आर्थिक कोंडी झाली. मात्र, वेळ वाया न घालवता चाळीशीतल्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयने रायगडाची अभ्यासपूर्ण हुबेहुब प्रतिकृती साकारली. घरासमोर लहानपणी किल्ले बनविणाऱ्या प्रतापला शिवरायांच्या पराक्रमाबद्दल आकर्षण आधीपासूनच होते. दोन वर्षांपासून प्रतापने रायगड किल्ल्याची अप्रतिम प्रतिकृती साकारण्याचे ठरवले अन्‌ लॉकडाउनच खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला. दोन महिन्यांत हुबेहुब प्रतिकृती साकारल्याने शहर परिसरातून या अप्रतिम कलाकाराचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - चोरट्यांनी ATM मशीन स्कॉर्पिओतून पळवलं; 5 मिनिटाची चोरी CCTV त कैद

काळेवाडी ज्योतिबा नगर येथील प्रताप रामचंद राऊत कुटुंबियाने किल्ले रायगडाची 'शिवकालीन राजवैभव' थीम साकारली आहे. परिसरातील नागरिकांसाठी हा कुतूहलाचा विषय झाला आहे. प्रताप यांचे वडील, मुलगा व पत्नी यांनीही त्यांना माती आणणे व इतर साहित्य आणून देण्यास मदत केली. सर्व नागरिक या किल्ल्याला भेट देऊन तयार केलेल्या प्रतिकृती बद्दल आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. प्रत्यक्ष भेट न घेताही किल्ले रायगडाचे फोटो, व्हिडिओ, पुस्तके जमा करून किल्ल्याची महिती घेऊन मांडणी करण्यात आली आहे. गडावर काय वास्तु होत्या? त्या ठिकाणांची नावे कोणती? गूगल मॅप, नकाशाच्या सहाय्याने वास्तुंच्या जागा ठरवण्यात आल्या. एप्रिल महिन्यात किल्ला बनविण्यास सुरवात झाली. मे आणि जून दोन महिने हा किल्ला बनविण्यासाठी वेळ लागला.

हेही वाचा - Sakal Exclusive : मेट्रो खोदकामावेळी पुण्यात सापडले भल्यामोठ्या प्राण्यांचे अवशेष; हत्तीची हाडं असल्याचा निष्कर्ष

वहीचा पुठ्ठा, माती, दगड, पीओपी, कार्डशिट वापरून किल्ला तयार करण्यात आला. तीन फूट उंचीचा कडा असणारा डोंगर आधी उभा करण्यात आला. 10 ते 12 दिवसांत काम पूर्ण करून मग पुठ्ठयापासून बनवलेल्या सर्व वास्तुची मांडणी करण्यात आली. हुबेहुब डोंगर वाटावा यासाठी त्याला लाकडी भुसा आणि रंगीत भुसा लावण्यात आला. आठ ते दहा हजार रुपये खर्च किल्ला बनविण्यासाठी आला.

येथे सर्व कामे विनामूल्य होतात...पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय​

काय- काय साकारले आहे?
पाचाड, नाना दरवाजा, मदारमाची, महादरवाजा, चोर दिंडी, हत्ती तलाव, शिरकाई मंदिर, गंगासागर तलाव, मनोरे, पालखी दरवाजा, पाहुणे आणि भुई विश्रांती गृह, राणीवसा, राजगृह, रत्नशाळा, अष्टप्रधानवाडा, मेण दरवाजा, धान्य कोठार, राजगृह, मेघडंबरी, राजसभा, रामेश्‍वर मंदिर, वृंदावन, दारू कोठार, वाघ दरवाजा, टकमक टोक, जगदिश्‍वर मंदिर, परदेशी पाहुणे निवास, भवानी मंदिर, कोळिंब तलाव, ब्राम्हण वस्ती, बाजारपेठ, हिरकणी टोक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During lockdown Pratap Raut a food delivery boy replicated Raigad fort