'आम्ही करू मुठाईचं रक्षण'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - "मुठा नदी आमची माय', "मुठाई माझी, मी मुठाईचा', "आम्ही करू तिचं रक्षण', "आम्ही करू नदीचे रक्षण, रोखू तिचे शोषण' यांसह "मुठाई'चा जयजयकार करत हजारो विद्यार्थ्यांनी केलेली मानवी साखळी अन्‌ नदीच्या स्वच्छतेसाठी घेतलेली प्रतिज्ञा अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी मुठा नदीपात्र लाल-निळ्या रंगांच्या कापडांनी उजळून निघाले.

पुणे - "मुठा नदी आमची माय', "मुठाई माझी, मी मुठाईचा', "आम्ही करू तिचं रक्षण', "आम्ही करू नदीचे रक्षण, रोखू तिचे शोषण' यांसह "मुठाई'चा जयजयकार करत हजारो विद्यार्थ्यांनी केलेली मानवी साखळी अन्‌ नदीच्या स्वच्छतेसाठी घेतलेली प्रतिज्ञा अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी मुठा नदीपात्र लाल-निळ्या रंगांच्या कापडांनी उजळून निघाले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत एन्व्हार्यमेंटल क्‍लब ऑफ इंडिया संस्थेसह वनराई, जलबिरादरी, जीवित नदी, माय अर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी साखळीचे डेक्कन येथील बाबा भिडे पुलाजवळ आयोजन केले होते. यात आसपासच्या जवळपास 12 शाळांमधील सुमारे पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. "नदीत कचरा टाकू नका', "नदी स्वच्छ राहिली, तरच आपले जीवन आनंददायी होईल', "मुठाई आमुची...', "नदी आमचे भविष्य, करू आम्ही तिच्या स्वच्छतेसाठी कष्ट', असे संदेश फलक घेऊन विद्यार्थी नदीपात्रात थांबून जनजागृती करत होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून "नदी स्वच्छतेचा' संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी पथनाट्याचेही सादरीकरण करण्यात आले. मानवी साखळीदरम्यान विद्यार्थ्यांनी निळ्या आणि लाल रंगाचे कापड हाती घेऊन प्रतिकात्मक पूररेषा कशी असते, हे जाणून घेतले.

याशिवाय नदीविषयी सर्वंकष विकासकामे करणाऱ्या विविध संस्था एकत्र येत असून, एक व्यापक चळवळ उभी राहत असल्याचेही संयोजकांनी अधोरेखित केले. "वनराई'चे रवींद्र धारिया, मनीष घोरपडे, विनोद बोधनकर, आमोद घमंडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना नदीविषयी मूलभूत माहिती, निळी आणि लाल पूररेषा, प्रदूषणाचे परिणाम, जैवविविधतेचे रक्षण, संस्कृतीमध्ये असलेले नदीचे महत्त्व यासंदर्भात माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार
मुठा नदीच्या संवर्धनासाठी चिमुकल्यांनी या वेळी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या वेळी पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले. या गटांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी नदी स्वच्छतेसंदर्भात पत्र लिहून घेण्यात आले आहे. लवकरच ही पत्रे मुख्यमंत्र्यांना दिली जातील, असे जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी यांनी सांगितले.

Web Title: human chain for muthe river cleaning