मित्राच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात...

file photo
file photo

तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून, मदतीसाठी शेकडो सहकारी शिक्षकांचे हात पुढे येत आहेत.

पाबळ (ता. शिरूर) येथील अमोल बाळासाहेब वारघडे हे उपक्रमशील व आदर्श शिक्षक सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गम क्षेत्रात पढरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी कोंढापुरी येथील केंद्र शाळेत मुख्याध्यापक म्हणून काही काळ सेवा केली आहे. अमोल वारघडे यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या आजारावर उपचार चालू आहेत. आतापर्यंत सुमारे 21 लाख रुपये खर्च झाले असून, आणखी बराच खर्च अपेक्षित आहे.

पद्मावती शाळा अध्यक्ष चषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत घेवून जाणारे, मितभाषीक व प्रामाणिक शिक्षक श्री. वारघडे गुरूजींच्या वैद्यकीय खर्चासाठी शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एकजुटीने पुढे आल्यामुळे मदतीचा हातभार लागला आहे. यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते अनिल पलांडे, शिवाजीराव वाळके, अविनाश चव्हाण, माऊली पुंडे, शहाजी पवार, सतिश नागवडे, बापूसाहेब लांडगे, रमेश थोरात, सतीश पाचर्णे, राजेंद्र टिळेकर आदी पदाधिकाऱयांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे 21 लाख रुपये उपचारासाठी खर्च झाला असून, सर्व शिक्षकांनी सुमारे 5 लाख रुपये निधी जमा केला आहे. आपल्या मित्राच्या उपचारासाठी शिक्षकांची चाललेली धडपड पाहून पिंपरी दुमाला येथील सरपंच गायत्री चिखले यांनीही आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वारघडे गुरूजींच्या उपाचारासाठी 5 हजार रुपये निधी जमा केला आहे.

श्री. वारघडे गुरूजी हे तालुक्यातील पद्मावती शाळेच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. बदलीच्या तडाख्यात गुरुजींनी उभे केलेले वैभव  आपल्या बदलीने सहकारी बांधवांच्या हाती सोपवून त्यांना दुर्गम भागात जावं लागले. घरापासून दररोज 100 किलोमीटरचा प्रवास दुर्गम शाळेत त्यांनी सुरू केला. यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा वाडा (ता. खेड) येथे सुरू असताना त्यांच्या शाळेतील खेळाडूंना चेअरअप देत असताना देहभान हरपून खेळाडूंकडे पाहात असलेल्या वारघडे गुरूजींना अचानक डोक्यात एक जोराची कळ आली आणि त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी स्थानिक दवाखान्यात प्रथमोपचार घेतले. नंतर डोक्याच्या सर्व तपासण्या करून चाकण व केईएम हा्स्पिटलमध्ये काही काळ उपचार घेतले. पुढे त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले. अफाट खर्चाचा भार आपण सर्वांनी उचलण्याच्या मानसिकतेतून संघटनांच्या नेत्यांनी मदतीसाठी ललकारी दिली. आपल्या सहकाऱयाला मनापासून मदत करण्याचा ठाम निर्णय होवून 1 हजारापासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या मदतीचा ओघ सुरू झाला आणि बघता बघता 5 दिवसात सुमारे 5 लाख रुपयांची मदत उभी राहिली. सहकारी मित्रासाठी शेकडो मदतीचे हात पुढे सरसावल्याचे पाहून पंचायत समितीचे अधिकारीही मागे राहिले नाहीत, त्यांनीही मदत निधी समितीकडे आपली मदत सुपूर्त केली. या 'विधायक'उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत असून, आम्हीही गुरूजींना मदत करणार, अशी भावना अनेक नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com